ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्याच्या कापूरबावडी हाय स्ट्रीट मॉलच्या तिसर्या माळ्यावर असलेल्या सिनेप्लेक्स मुव्ही थिएटरच्या कॅफेट एरिया परिसरात शनिवारी रात्री 11.20 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे तीन जवान श्वास गुदमरल्याने अत्यवस्थ झाले. तर एका जवानाच्या हाताला काच लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली. चारही जवानांना उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
शनिवारी रात्री अचानक कापूरबावडी परिसरातील हाय स्ट्रीट मॉलच्या तिसर्या माळ्यावरील स्नॅक्स कॉर्नर परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तसेच कापूरबावडी पोलीस अधिकारी, कर्मचारी आदींनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले.
आगीचे भीषण स्वरूप पाहता अग्निशमन दलाने 2- रेस्क्यू वाहन, 1- जम्बो वॉटर टँकर आणि 2 फायर वाहनाच्या सहायाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आग भडकत होती आणि धुराचे लोळ उठले होते. त्यात अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
याच प्रयत्नात धुराच्या लोळात फायरमन सुनील दराडे, दीपक बोराडे, विशाल पाटील, हे श्वास गुदमरल्याने अत्यस्वस्थ झाले. तर फायरमन जे. पी. वाघ यांच्या हाताला काच लागल्याने ते जखमी झाले. अत्यावस्थ आणि जखमी अग्निशमन दलाच्या फायरमन यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
सकाळी 6 वाजता आग आटोक्यात
अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, इतर पथकांनी रविवारी सकाळी 6च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. या आगीत आर्थिक नुकसान झाले.