मिरा-भाईंदरमध्ये ठाकरे व शिंदे गटाच्या बैठका सुरू

मिरा-भाईंदरमध्ये ठाकरे व शिंदे गटाच्या बैठका सुरू
Published on
Updated on

मिरारोड : पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात व सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये भूकंप घडवला आहे. त्यामुळे नक्की कोणता झेंडा हातात घ्यायचा या संभ्रमात असलेल्या कार्यकर्ते चार दिवस शांत होते. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत असून तणाव वाढत आहे. मिरा-भाईंदरमध्ये शांत बसलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन वेगवेगळे गट पडलेले दिसून येत आहेत. शनिवारी संध्याकाळी ठाकरे गट व शिंदे गट यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. या दोन्ही बैठकांना मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात शिवसेनेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आहे. त्यामुळे शिंदे गट व ठाकरे हे शक्तिप्रदर्शन करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी मिरा रोडच्या पेणकर पाडा भागात शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे तसेच महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत कल्सरिया यांच्यासह उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर , माजी नगरसेवक प्रशांत पालांडे , नगरसेवक कमलेश भोईर, भावना भोईर, दिनेश नलावडे गटनेत्या नीलम धवन नगरसेविका अर्चना कदम यांच्यासह अनेक शिवसैनिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या
पूर्वेश सरनाईक यांनी शिंदे गटाला समर्थन देण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला नगरसेवक राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, संध्या पाटील, अनंत शिर्के हे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सध्या 19 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक ठाकरे यांच्या समर्थनार्थ ठेवलेल्या बैठकीला होते. तर चार नगरसेवक शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थित होते. नगरसेवक राजू भोईर यांनी शिंदे गटात उडी मारली असली तरी त्यांच्या पत्नी भावना भोईर आणि भाऊ कमलेश भोईर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात विभागणी झाल्याचे दिसत आहे.परंतु हे विभाजन किती काळ टिकते ते पाहावे लागेल. शिंदे गटाची संख्या वाढणार असल्याचे सांगितले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news