ठाणे : धावत्या रेल्वेतील स्टंटबाजी तरुणावर बेतली; जखमी तरुणावर गुन्हा | पुढारी

ठाणे : धावत्या रेल्वेतील स्टंटबाजी तरुणावर बेतली; जखमी तरुणावर गुन्हा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : धावत्या लोकलच्या बंद बॅटरी रुमच्या दरवाजाच्या निमुळत्या जागेत लटकून स्टंटबाजी करणे तरुणाच्या अंगाशी आले. प्रवासादरम्यान पाय सटकल्याने सदर तरुण धावत्या रेल्वेतून खाली पडला. या घटनेचा व्हिडीओ दिवसभर वायरल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्गचे पो.नि. पंढरी कांदे यांनी दिली.

कळवा परिसरात राहणारा 18 वर्षीय दानिश खान हा चिंचपोकळी येथे जात होता. सकाळच्या सुमारास गर्दी असल्याने दानिश व त्याचा आतेभाऊ बंद बॅटरी रुमच्या दरवाजाच्या निमुळत्या जागेत लटकून प्रवास करत होते. कळवा स्थानक सोडताच 35/14 किलोमीटर अंतरावर पाय सटकल्याने दानिश धावत्या रेल्वेतून पडला. दरम्यान, ठाणे स्थानकात उतरुन दानिशच्या आतेभावाने अपघातस्थळ गाठले व एका प्रवाशाच्या मदतीने दानिशला कळवा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात त्याचा डावा हात फॅक्‍चर झाला आहे.

स्टंटबाजीचा व्हिडीओ वायरल

या अपघाताचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओबाबत लोहमार्ग पोलिसांना दुपारपर्यंत माहित नव्हते. दरम्यान ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पो.नि. पंढरी कांदे यांनी व्हिडीओतील काही ठिकाणांचे विश्‍लेषण करून अखेर अपघातस्थळ गाठले. सदर अपघाताबाबत चौकशी करत असताना दानिश कळवा रुग्णालयात दाखल असल्याचे समजले, अशी माहिती पो.नि. कांदे यांनी दिली.

 

हेही वाचा

Back to top button