ठाणे जिल्ह्यात शिवसैनिक शांत; निर्णयाची प्रतीक्षा | पुढारी

ठाणे जिल्ह्यात शिवसैनिक शांत; निर्णयाची प्रतीक्षा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह केलेल्या  बंडाने राज्यात राजकीय भूकंप झाला असताना अजूनही ठाणे जिल्हा शांत आहे. शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून देणार्‍या ठाण्यातून बंडाचे नेतृत्व झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक हा शांत असून तो शिंदे यांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे.

दुसरीकडे खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, केदार दिघे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मातोश्रीच्या मदतीला धावले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तर राज्य सरकार कोसळेल आणि महापालिकांमधील राजकीय समीकरणे बदलतील. शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिली आक्रमक प्रतिक्रिया ही ठाणे जिल्ह्यातून उमटत असे. आता बंडाचे उगम ठाण्यातून असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शांतता पसरली आहे.

शिंदे यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे सुरतला गेले आहेत. त्याची तयारी काही दिवसांपासून सुरु होती. राज्य सभेच्या निवडणुकीनंतर नाराजी अधिक उफाळून आणि ठाण्यातील शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे संकेत देण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच बंड होऊनही ठाण्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक अजूनही शांत बसून शिंदे हे कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. अजूनही अनेक शिवसैनिकांना शिंदे हे पक्ष सोडणार नाहीत, असेच वाटत असल्याने त्यांच्या विरोधात फारसे कुणी आक्रमक झालेले दिसून येत नाही. दुसरीकडे ठाण्यातील खासदार राजन विचारे आणि आमदार रवींद्र फाटक हे नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुखांच्या मदतीला धावून गेले आहेत. यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा मातोश्री अडचणीत आली. त्यावेळी ठाणेकरांनी धाव घेऊन मातोश्रीला संकटातून बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावत होते.

आनंद दिघे असते तर कुणी असे धाडस केले नसत

राज्यात राजकीय भूकंप होऊनही ठाण्यासह जिल्ह्यात शांतता आहे. कुणीही आक्रमक भूमिका घेताना दिसत नसून सर्वसामान्य शिवसैनिकांना मात्र मोठा धक्का बसला आहे. कोणाचीही शिंदे हे अशी भूमिका घेतील यावर विेशास बसत नाही. अजूनही ते सर्व परत येतील, असा आशावाद सगळ्यांना आहे.

ठाणे ग्रामीण भागातही शांतता असून सर्व शाखा आणि कार्यलये शांतपणे समाज माध्यमे आणि टीव्हीवरील बातम्या पाहत आहेत. केवळ धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी आनंद दिघे असते तर कुणी  असे धाडस केले नसते, शिंदे यांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य कार्यकर्ता दुखावला असून जेव्हा जेव्हा शिवसेनेला दिघेंची गरज भासेल तेव्हा आम्ही शिवसेनेसोबत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

Back to top button