ठाणे : 'अग्निपथ' योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महामार्ग रोखला | पुढारी

ठाणे : 'अग्निपथ' योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महामार्ग रोखला

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरूणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ या योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार युवक शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत आज (दि.२०) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास हायवेवर रास्ता रोको करण्यात आल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढीस लागणार आहे. तसेच या तरूणांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत, या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पाचपाखाडी येथे मुंबईच्या दिशेने जाणारा पूर्वद्रूतगती महामार्ग अडवला. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे अर्धा तासानंतर नौपाडा पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

यावेळी शहराध्यक्ष विक्रम खामकर म्हणाले की, सैनिकांना वन रँक वन पेंशन देतो म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा प्रवास आता “नो रँक नो पेंशन”, पर्यंत येवून थांबला आहे. अग्नीवीरच्या नावाखाली जो खेळ मोदी सरकारने सुरू केलाय. तो येणाऱ्या काळात आपल्या देशाला अत्यंत भयानक स्थितीकडे नेऊ शकतो. ४ वर्षांच्या सेवेनंतर बाहेर पडणाऱ्या तरुणांच्या सशस्त्र टोळ्या बनू शकतात. याचा वापर एखाद्या राज्याचे सरकार पाडण्यापर्यंत देखील होवू शकतो. ४ वर्षांच्या सेवेनंतर जेव्हा भविष्य अंधकारमय दिसेल, तेव्हा शस्त्रास्त्रांची ट्रेनिंग घेतलेली तरुण मंडळी कोणता मार्ग अवलंबतील, या बाबत सांगणे अवघड आहे.

या आंदोलनात समीर नेटके, श्रीकांत टावरे, अभिषेक पुसाळकर, साकिब दाते, मैसर शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button