

कल्याण : पुढारी वृत्तसेवा
आगरी समाजाची समृद्ध संस्कृती व परंपरा, स्वादिष्ट रुचकर खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाबरोबरच नव्या पिढीला दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या २२ व्या पर्वासाठी जोरदार तयारी सुरू आहे. डोंबिवलीतील संत सावळारामबाबा म्हात्रे मैदानावर २ ते १६ डिसेंबरपर्यंत रंगणार असल्याची माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली आहे.
आगरी युथ फोरमच्या माध्यमातून डोंबिवलीत २२ वर्षांपूर्वी सन २००४ साली पहिल्यांदा आगरी महोत्सव सुरू झाला होता. त्यानंतर मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आगरी महोत्सव भरविले जाऊ लागले. या महोत्सवाला आगरी समाजबांधवांबरोबरच इतर समाजातील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. आगरी महोत्सवाच्या यशामुळे २०१७ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचीही संधी आगरी युथ फोरमला मिळाली होती.
दरवर्षी आगरी महोत्सवाच्या आठ दिवसांच्या काळात दोन ते अडीच लाखांहून अधिक नागरिकांकडून भेट दिली जाते. या महोत्सवात रुचकर व स्वादिष्ट आगरी पद्धतीच्या खाद्यपदार्थांबरोबरच ग्राहकोपयोगी वस्तू, फॅशन-वस्त्रप्रावरणे, दागिने, सौंदर्य, प्रसाधने, हस्तकला, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, शेती, पर्यटन आणि मालमत्ता व वाहने खरेदी करण्यासाठी विविध स्टॉल उभारले जातात. त्यात शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनपर स्टॉलबरोबरच काही सेवाभावी संस्थांच्या स्टॉलचा समावेश आहे. या स्टॉलची नोंदणी सुरू झाली आहे.
या महोत्सवातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह नागरिकांची सुरक्षा, स्टॉलची रचना, प्राथमिक आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा देण्याबाबत तयारी सुरू आहे. आगरी महोत्सवाच्या डॉबिवलीतील कार्यालयात बैठका सुरू असून, महोत्सवाचे काटेकोर नियोजन केले जात आहे.
राज्यातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती राहणार
आगरी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रेरणादायक व्यक्तींचे परिसंवाद, व्याख्याने, चर्चासत्रे, मुलाखतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानुसार महोत्सवामध्ये यावर्षी राज्यातील काही नामवंत मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मान्यवरांचे प्रेरणादायक विचार नागरिकांना ऐकता येतील. तरी या महोत्सवासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन २२ व्या आगरी महोत्सवाचे अध्यक्ष शरद पाटील यांनी केले आहे.