डोंबिवली : आधीच पावसामुळे उध्वस्त झालेले झोपडे चोरट्यांनी लुटले

डोंबिवली : आधीच पावसामुळे उध्वस्त झालेले झोपडे चोरट्यांनी लुटले
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण जवळच्या कचोरे गावाजवळ असलेल्या झोपडीत राहणाऱ्या एका गरीब मजुराला कठीण प्रसंगाने ग्रासले. न्यू गोविंदवाडीतील पाईपलाईन रोडला बारदान आणि पत्र्यांच्या साह्याने बांधलेल्या छोट्याशा झोपडीत तो रहात होता. शुक्रवारी रात्री पाऊस पडल्यामुळे एका वृद्ध मजुराची झोपडी पूर्णपणे तुटून पडली. मात्र नेमक्या याच संधीचा फायदा घेत चोरांनी तुटलेल्या झोपडीमधील सामान चोरण्याचा प्रयत्न केला. या झोपडीतून चोरलेल्या सामानासह पोलिसांनी एका संधीसाधू चोरट्याला गजाआड केले आहे.

रतन त्रिंबक ढालवाले (62) हा गरीब मजूर कचोरे गावातील एका कोपऱ्यात झोपडी बांधून आपला उदरनिर्वाह कसाबसा करत होता. मात्र अचानक आलेल्या पावसात या गरीबाची झोपडी पूर्णपणे उध्वस्त झाली. ही संधी साधून चोरट्याने सदर झोपडीतील उघड्यावर पडलेले घरसामान चोरून नेले. या सामानाची किंमत जरी 11 हजारांच्या घरात असली तरी गरिबांसाठी त्याची किंमत लाख मोलाची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले घरसामान दिसेनासे झाल्याने वृद्धावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र तरीही स्वतःला सावरत या वृद्धाने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली कैफियत मांडली.

शोध मोहीम राबवून चोरट्यास अटक

संबंधीत वृद्धाची केविलवाणी अवस्था पाहून उपस्थित पोलिसांनी त्यांना मदतीचा हात देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करताना जमादार रमेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहीम राबवली. काही अवधीत त्याच परिसरातील भारतनगरमध्ये राहणाऱ्या नासीर हुसेन पठाण (30) नामक बदमाशाला अटक केली.

या चोरट्याकडून वृध्दाच्या झोपड्यातील चोरलेले सर्व सामान हस्तगत केल्याचे जमादार रमेश चौगुले यांनी सांगितले. तसेच पावसामुळे पूर्णतः भुईसपाट झालेली या वृद्धाची झोपडी पूर्ववत उभी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने पोलिसांतील माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news