संमेलनाच्या अध्यक्षपदावर वैदर्भिय साहित्यिकाची वर्णी? | पुढारी

संमेलनाच्या अध्यक्षपदावर वैदर्भिय साहित्यिकाची वर्णी?

ठाणे ; अनुपमा गुंडे : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षामुळे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान महात्मा गांधींनी पावन केलेल्या वर्ध्याच्या भूमीला देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने रविवारी जाहीर केला. संमेलनाच्या स्थळनिश्चितीनंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या चर्चांना समाजमाध्यमांवर उत आला आहे.

अनेक इच्छुकांनी विविध समाजमाध्यमांवर आपल्या अनुयायी तसेच समर्थकांमार्फत आपली नावे पुढे करण्याची चढाओढ सुरू केली असली, तरी साहित्याच्या प्रांता बरोबरच, गांधीवादी विचारवंत आणि विदर्भाच्या भूमीतील साहित्यिकांची निवड वर्ध्यात होणार्या 96 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी व्हावी, असा सूर उमटत आहेत. ज्येष्ठ प्रकाशक, गांधीवादी विचारवंत रामदास भटकळ, विदर्भाच्या भूमीतील गांधीवादी विचारवंत सु. श्री. पांढरीपांडे, मूळ वर्धा वासी किशोर सानप, जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, प्रा. रावसाहेब कसबे, अभय बंग, आशा बगे ही नावेही चर्चेत आहेत. रामदास भटकळ हे अजातशत्रू असल्याने त्यांच्या नावासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 4 घटकसंस्थाही पुढाकार घेतील, अशी चर्चा आहे.

संमेलनाध्यक्षांच्या निवडीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केलेल्या घटना दुरूस्तीनंतर महामंडळाच्या 4 घटक संस्थांकडून प्रत्येकी 3 नावे, समाविष्ट व संलग्न संस्थांकडून प्रत्येकी 1 नाव, संमेलनाची निमंत्रक संस्था व विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून प्रत्येकी एकेक नाव सुचवण्यात येते. यासाठी महामंडळाच्या गोवा येथे बैठकीत जुलै – ऑगस्टमध्ये चर्चो होईल, परंतू संमेलन स्थळ जाहीर झाल्यावर समाजमाध्यमावर चर्चा रंगू लागल्या आहेत. ज्या प्रांतात संमेलन असते, त्या भागातील साहित्यिकांची नावे प्राधान्याने घटक संस्था सुचवतात, असा पायंडा पडला आहे. विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष आणि महात्मा गांधीचे प्रदीर्घ वास्तव्य असलेले वर्धा अशा दुग्धशर्करा योगात विदर्भाच्या भूमिपूत्राला संमेलनाध्यक्ष पद मिळावे, असाही एक सूर उमटत आहे.

मूळ वर्ध्याचे असलेले किशोर सानप यांचा संमेलनाध्यक्ष पदावर पहिला हक्क असल्याच्या पोस्ट माध्यमावर फिरत आहेत. सानप यांचे नाव बडोदा येथील संमेलनाच्या वेळी चर्चेत होते. विदर्भाच्या भूमीतील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. सु. श्री. पांढरीपाडे यांना हा मान मिळावा अशी काहींची इच्छा आहे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी, यांच्या नावाची चर्चा आहे. मेधा पाटकर या जन आंदोलनाच्या नेत्या असल्या तरी त्या चांगल्या कवयत्री आहेत. त्यामुळे त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड व्हावी, अशी इच्छा शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button