बदलापूर : लातूर-मुंबई एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत | पुढारी

बदलापूर : लातूर-मुंबई एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

बदलापूर ; पुढारी वृत्तसेवा : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या अप दिशेला एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

आज (दि.३०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लातूर-मुंबई एक्स्प्रेसचे इंजिन अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान फेल झाले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सकाळी सात वाजल्यापासून बंद होती. काही काळाने रेल्वे सेवा सुरू झाली आहे. पण अजून अनेक गाड्या उशीराने धावत आहेत. बदलापूरहून ७ वाजून ६ मिनीटांनी  मुंबईला जाणारी लोकल सुटली आहे.

बदलापूरहून सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनंतर कोणतीही गाडी मुंबईच्या दिशेने अद्यापही गेलेली नाही. पुढील अर्ध्या ते पाऊण तासानंतर ही रेल्वेसेवा सुरळीत होऊ शकते असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान अप दिशेला इंजिन फेल झाल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या देखील बदलापूर ते कर्जत दरम्यान खोळंबल्या आहेत. तसेच कर्जत – खोपोली पासून बदलापूर ते पुढे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

डाउन मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी बदलापूरला पुन्हा येऊन परत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मात्र विविध स्टेशनांवर थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या साऱ्याचा मानसिक फटका चाकरमान्यांना सहन करावा लागला. अनेक वेळा असे प्रकार घडत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.

Back to top button