

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पहिले मराठा वसतिगृह हे ठाण्यात सुरु झाले असून ते फक्त आणि फक्त मराठा मुला-मुलींसाठीच आहे, यात कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. पहिले हॉस्टेल हे मुलींसाठी असून लवकरच १०० मुलांकरिता ठाणे महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या नव्या इमारतीचे उद्धाटन केले जाईल. शिवसेना नेहमी दिलेले शब्द पाळते, हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे, आम्ही नेहमी दिलेली वचने पूर्ण करतो असे स्पष्ट करीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा वसतिगृहाबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. निमित्त होते ठाणे महापालिका मुख्यालयावरील छत्रपती शिवराज्याभिषेक भित्तिशिल्पाचे अनावरण समारंभ.
ठाणे महापालिका मुख्यालयावरील जुने छत्रपती शिवराज्याभिषेक भित्तिशिल्प हे नादुरुस्त झाले होते. याबाबत मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे आंदोलन आणि निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. तसेच मराठा क्रांती मोर्च्याच्या काही समन्वयकांनी नवीन भित्ती शिल्प उभारण्याची मागणीही केली. याची गंभीर दखल घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी छत्रपती शिवराज्याभिषेक भित्तिशिल्प नवीन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हिरवा सिग्नल दिल्यानंतर तब्ब्ल दोन कोटी रुपये खर्चून सुरेख असे छत्रपती शिवराज्याभिषेक भित्तिशिल्प नवीन उभारण्यात आले.
त्याचे आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. बिपीन शर्मा , सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती , माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बारटक्के, रमाकांत मढवी आणि कैलास म्हापदी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
शिल्पाच्या उद्घाटनास खासदार छत्रपती संभाजी महाराज यांना बोलावले नाही म्हणून भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश आंब्रे यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला होता. यापूर्वी त्यांनी मराठा हॉस्टेल हे मराठा मुलांसाठी नसून पालकमंत्री शिंदे यांनी समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर नामदार एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील हॉस्टेल हे फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठीच असेल असे स्पष्ट करीत आणखी १०० मुलांसाठी नवीन इमारतीचे लवकरच उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले.