डोंबिवली : संशयखोर पतीकडून भररस्त्यात पत्नीवर चाकू हल्‍ला | पुढारी

डोंबिवली : संशयखोर पतीकडून भररस्त्यात पत्नीवर चाकू हल्‍ला

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा

भररस्त्यात पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पूर्वेतील दत्तनगर परिसरात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामनगर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ देवकर (वय 45) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. त्याच्या पत्नीच्या फिर्यादिवरून त्‍याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ सोमनाथ हा पत्नीसह राहतो. सोमनाथ हा बेरोजगार असून, तो वारंवार पत्नीवर संशय घेतो तसेच घरातील पैसेही चोरते, असा आरोप त्‍याच्या पत्‍नीने केला आहे.

पत्‍नीने सोमनाथला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमनाथ ऐकत नसल्याने वैतागलेल्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. आज (मंगळवार) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यात जाण्यासाठी त्‍या घरासमोर रिक्षात बसल्या. अचानक पाठीमागून आलेल्या सोमनाथने पत्‍नीच्या मान, पाय आणि हातावर सपासप वार केले.

गंभीर जखमी झालेल्या या महिलेला रिक्षाचालक रुग्णालयात उपचारासाठी नेत होता. मात्र गस्त घालत असलेल्या पोलिसांनी रिक्षात रक्तबंबाळ महिलेला पाहिल्यावर रिक्षा थांबवून रिक्षाचालकाकडे विचारणा केली. रिक्षाचालकाने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी जखमी महिलेला महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. पत्नीवर वार करून पसार झालेला हल्लेखोरसोमनाथ अद्याप हाती लागला नसून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Back to top button