होतकरू प्रज्ञावंतांना ‘ज्ञानसिंहासना’चा आधार

होतकरू प्रज्ञावंतांना ‘ज्ञानसिंहासना’चा आधार
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  जगद्गुरूंच्या पाच पीठांमध्ये असलेल्या वाराणसी-काशिपीठाला 'ज्ञानसिंहासन' म्हणून संबोधण्यात येते. याचाच आधार आज देशभरातील विद्यार्थ्यांना मिळत असून, गत 15 वर्षांपासून प्रति विद्यार्थ्याला वार्षिक 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

काशिपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी त्यांच्या शष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त 'श्री जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य शिष्यवृत्ती' या योजनेची घोषणा केली. आता त्यांचे वय 75 वर्षे असून, गत 15 वर्षांपासून सुरु असलेल्या काशिपीठाच्या शिष्यवृत्तीचा असंख्य विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकीसह इतर उच्च शिक्षण घेणार्‍या व पालक नसलेल्या, गरीब, कष्टकरी, हमाल, तोलार, मजूर, धुणी-भांडी करणार्‍या, रिक्षाचालक, टांगेवाले, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांसह असंघटित कामगारांना प्रती महिना एक हजारप्रमाणे वार्षिक 12 हजार रुपये देण्यात येतात.

वर्षातून दोनवेळा आरटीजीएसद्वारे ही शिष्यवृत्ती जमा केली जाते. आतापर्यंत याचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांना झाला असून, यंदा 450 विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. यंदा सोलापुरातील 22 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केवळ सोलापूर, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना नव्हे, तर देशभरातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोव्याबरोबरच मूळ भारतातील पण आता परदेशात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना या माध्यमातून शैक्षणिक मदत करण्यात येत आहे. भविष्यातही ही सेवा अविरत सुरू राहणार आहे. यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.
धर्मकार्याबरोबरच शैक्षणिक, आरोग्यविषयक कामांवर महास्वामींनी भर दिला आहे. याचा फायदा अनेकांना होत आहे. भविष्यात याची व्याप्तीही वाढणार आहे.

प्रमुख, काशिपीठ शिष्यवृत्ती ठेवीतील व्याजातून शैक्षणिक मदत  जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांना मिळालेल्या दक्षिणा, देणग्या, सोने, चांदी, धर्मसभा, पुराण, प्रवचनांच्या माध्यमातून मिळणार्‍या देणग्यांमधून शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत एक कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या व्याजातून यंदा 450 विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे. यात कोणालाही सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मदत करता येते. विद्यार्थी ठरविण्यासाठी त्याची एक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे मदतीसाठी निवड केली जाते.

– रेवणसिद्ध वाडकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news