

सोलापूर : हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी स्थापन करून वालचंदशेठ यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्रात विमानयुग सुरू केले. विमाननिर्मितीचा उद्योग करणार्या प्रगत देशांच्या यादीत भारताचे नाव वालचंदशेठ यांच्यामुळेच ठळकपणे झळकू लागले. अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तीचे नाव सोलापूर विमानतळास देण्यात आल्यास तो सोलापूर विमानतळाचा सन्मान ठरेल.
सोलापुरात विमानसेवा सुरू होण्याच्या हालचाली सध्या गतिमान आहेत. तसेही केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेत सोलापूरचा समावेश यापूर्वीच झाला आहे. परंतु, काही अडचणींमुळे या योजनेंतर्गत सोलापुरातील विमानसेवा सुरू होणे प्रलंबित राहिली होती, रखडली होती. आता विमानसेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
विमानतळाची सध्याची धावपट्टी 2.1 किलोमीटरची असून त्यावरून 72 आसनी आर.टी.आर. विमाने सेवा देऊ शकतील. या धावपट्टीसंदर्भातील अहवाल 'डीजीसीए'कडे पाठवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई व तिरुपती याठिकाणी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळास सोलापूरचे सुपुत्र तथा 1940-41 च्या सुमारास भारतात पहिल्यांदा विमानाचा कारखाना सुरू करणारे वालचंदशेठ यांचे नाव या विमानतळास दिल्यास तो खर्याअर्थाने सोलापूरच्या विमानतळाचा सन्मान ठरेल.
कारण वालचंदशेठ हे देशातील एक मोठे उद्योजक होते. त्यांनी तत्कालीन ब्रिटिश-हिंदुस्थान सरकारबरोबर वाटाघाटी करून काही भागधारकांकडून भांडवल उभे करुन ब्रिटिशकालीन हिंदुस्थानात अस्सल स्वदेशी विमान बनवले व ते हवेत उडवलेही आहे. अशा थोर उद्योजकाचे नाव जर सोलापूर विमानतळास दिले तर तो सोलापूर विमानतळाचा बहुमान ठरेल, यात शंकाच नाही.
वालचंद यांचा 23 नोव्हेंबर 1882 साली सोलापुरात जन्म झाला. वालचंद हे हिराचंदजींचे चौथे अपत्य. जन्मानंतर अवघ्या पंधराच दिवसांत त्यांच्या आई राजूबाई इहलोक सोडून गेल्या. तेव्हा त्यांच्या काकू उमाबाई सखारामशेठ यांनी वालचंदांचा सांभाळ केला. मराठी चौथ्या शाळेपर्यंत शिक्षण सोलापुरात घेऊन वडिलांनी व्यवसायानिमित्ताने मुंबईस स्थायिक होण्याचे निश्चित केल्यानंतर वालचंद हेदेखील पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. पुढे दहावीच्या परीक्षेच्या काळात मुंबईत प्लेगची साथ आल्याने वालचंद यांनी मॅट्रिक्युलेशनची परीक्षा सोलापूरच्या सरकारी हायस्कूलमधून दिली.
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 1900 साली त्यांचा पहिला विवाह सोलापुरातीलच सराफ गौतमचंद खिलाचंद यांची कन्या जिऊबाई यांच्याशी झाला. त्यांनी काही काळ मोहोळच्या बाजारात ज्वारी विक्रीचा व्यवसायही केला. त्यात त्यांना तोटा सहन करावा लागला. सोलापुरातील रेल्वे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या कचेरीत कारकून म्हणून काही काळ काम केले. तेथे त्यांना रेल्वेच्या ठेक्याची कामे कशी मिळवली जातात, ती कशी पार पाडली जातात याची माहिती मिळाली. त्यातून त्यांनी येडशी-तडवळ दोन गावांदरम्यान सात मैलांचा एक पूरक रूळ रस्ता तयार करण्याचा मक्ता भागीदारीत मिळवला. हे त्यांचे आयुष्यातील रेल्वेचे पहिले काम. येथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. तेथून वालचंद यांनी मुंबईकडे कामासाठी प्रयाण केले.
दरम्यान, वेगवेगळे उद्योग करत लक्ष्मीपती झालेल्या वालचंदांनी विमान तयार करण्याच्या व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरवले. दुसर्या महायुद्धाच्या आरंभी जून 1940 मध्ये फ्रान्सचा युद्धात पाडाव झाल्यावर ब्रिटन, हिंदुस्थानमध्ये घबराट निर्माण झाली. तेव्हा ब्रिटनने, तुमच्या संरक्षणाची विशेषतः हवाई संरक्षणाची तुम्हीच तजवीज करा, असे हिंदुस्थान सरकारला कळवले. त्याचवेळी ब्रिटनच्या एका अधिकार्याच्या सल्ल्यानुसार वालचंदशेठ यांनी सरकारला विमान कारखाना सुरू करण्यासंदर्भात आपल्या प्रयत्नांविषयी कळवले. वालचंदशेठ यांच्यासारखा उद्योजक स्वतःहून पुढे आल्याने हिंदुस्थानच्या व्हाईसरॉयने वालचंदशेठ यांच्या विमान बनवण्याच्या योजनेस पाठिंबा दिला.
हिंदुस्थान सरकार आणि इंग्लंडमधील ब्रिटिश सरकार यांची विमान कारखान्यास संमती मिळताच वालचंद यांनी तो उभारण्यास सोयीस्कर जागा पाहण्यास आरंभ केला. भागभांडवलाचीही व्यवस्था लगेच होणे आवश्यक होते. कंपनी रितसर ज्यादिवशी स्थापन होईल त्यादिवशी वीस लाख रुपये आणि 31 जानेवारी 1941 च्या आत आणखी वीस लाख रुपये बँकेत जमा झालेले असले पाहिजेत, तरच सरकारकडून चाळीस लाख डॉलर्स किमतीची ऑर्डर कंपनीकडे नोंदवली जाईल व तिच्या बिलापोटी निम्मी रक्कम आगाऊ मिळेल, अशी अट सरकारने कंपनीशी केलेल्या करारात होती. त्याप्रमाणे वालचंद यांचे स्नेही तुलसीदास किलाचंद व धरमसी खटाव यांनी कंपनीचे प्रवर्तक बनून सर्वांनी मिळून 25 लाखांचे भाग विकत घ्यायचे ठरवले. कंपनीचा कारभार चालवण्याकरिता वालचंद तुलसीदास खटाव या नावाने लिमिटेड कंपनी स्थापन करण्याचे निश्चित केले.
बंगळूर शहराच्या पूर्वेस लष्करी छावणीच्या जवळच असलेली 300 एकर जागा या विमान कारखान्याच्या इमारत व धावपथासाठी निश्चित करण्यात आली. म्हैसूरच्या कंपनी कायद्यानुसार हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी असे नाव देऊन विमान कंपनी रितसर नोंदवण्यात आली. सात महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर चाचणीसाठी पहिले हार्लो ट्रेनर विमान 1941 च्या जुलैमध्ये बाहेर काढले व ते उडवून पाहिले. तज्ज्ञांनी त्याला सर्व कसोट्या लाऊन ते पसंत केल्यावर 29 ऑगस्ट 1941 रोजी हिंदुस्थान सरकारला ते सुसज्ज स्थितीत सादर केले. अशा पद्धतीने बंगळुरू येथे स्वतः उभारलेल्या कारखान्यात अस्सल हिंदुस्थानी बनावटीचे विमान वालचंद आणि कंपनीने बनवले. अशा या थोर, द्रष्ट्या उद्योजकाचे नाव जर सोलापूरच्या विमानतळास दिले तर ते नक्कीच सोलापूरसाठी भूषणावह ठरेल, यात शंकाच नाही.