

सोलापूर ; संदीप येरवडे : गोरगरिबांच्या उपचाराचा आधारवड असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिलने विशेषत: कोरोना काळात जिल्ह्याच्या नॉनकोव्हिड उपचाराचे शिवधनुष्य पेलले आहे. अन्य रुग्णालये बंद असताना सिव्हिलमध्ये वर्षभरात विविध आजारांच्या दहा हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर सिव्हिल हॉस्पिटलने नॉन कोव्हिड वर्षभरात 3 लाख 64 हजार 533 रुग्णांवर उपचार केले. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल कोरोना काळात रुग्णसेवेच्यादृष्टीने वरदान ठरले आहे.
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल आणि तेथील सुविधांबाबत नाके मुरडली जातात. महागडे उपचार परवडत नाहीत अशा गोरगरिबांसाठी हे हॉस्पिटल असे म्हटले जाते. पण जेव्हा
कोरोनाची पहिली लाट सुरू झाली होती. त्यावेळी अनेक खासगी डॉक्टर्सनी हॉस्पिटल शटरडाऊन केली. खासगीतील सर्वच शस्त्रक्रिया बंद झाल्याने उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत होते.
सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील रूग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलची यंत्रणा देवदूत बनून धावली. कोरोना रूग्णासह सिव्हिल हॉस्पिटलने नॉन कोविड रूग्णावर देखील उपचार सुरू ठेवले होते. सिव्हिल हॉस्पिटलच्या यंत्रणेवर कोरोना रूग्णाचा मोठा ताण होता. विशेषतः एखादी शस्त्रक्रिया पुढे सहा महिने अथवा वर्षभरात केल्यानंतर चालू शकेल, असे रूग्ण वगळता अत्यावश्यक शस्त्रक्रियांसाठी डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून काम केले.
कोरोना काळात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नॉन कोविडचे रूग्ण कमी प्रमाणात येत होते. कोरोनाचे भीतीने रूग्ण उपचार घेण्याचे टाळत होते. पण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलवरच कोरोनाची मदार अवलंबून होती. तरी कोरोना काळात देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज 1 हजार ते 1200 रूग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू होते. काही रूग्ण किरकोळ आजार असेल तर औषधे गोळ्या घेवून घरी जात होते. एकूणच अशा सुमारे 3 लाख 64 हजार 533 रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले.
महत्वाची मेडिसन, शस्त्रक्रिया, स्त्री रोग, बालरोग, अस्थिविकार, कान, नाक, घसा तसेच भाजलेला विभाग आदी आजारावरील शस्त्रकिया व उपचार सिव्हिल हॉस्पिटलने केले आहे. यानिमित्ताने वर्षभरात नॉन कोविड रूग्णांला सिव्हिल हॉस्पिटलचा मोठा आधार मिळाला आहे.
सिव्हिलच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस म्हणाल्या, जसे खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या दर्जेदार सुविधा सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळू लागल्या आहेत. एकप्रकारे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल झाले आहे. त्यामुळे सर्व तपासणी, ऑपरेशन सिव्हिल हॉस्पिटमध्ये करणार्यांची संख्या वाढत आहे. सर्वसामान्य रुग्णांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील सुविधांचा लाभ घ्यावा.