

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : जि.प. प्राथमिक शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी अधिकार्यांच्याविरोधात अवमानास्पद वक्तव्य केले होते. याप्रकरणी निषेध व्यक्त करीत शिक्षण विभागातील विस्तार अधिकार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. याप्रकरणी भरले यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. प्रशासकीय अधिकार्यांनीही मन मोठे करून झाल गेले विसरुन जाण्याची भूमिका घेतल्याने या वादावर पडदा टाकला.
जि. प. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या परिस्थितीत दोन शिक्षक संघांतील नेत्यांची धुसफूस प्रशासनात घुसली गेली होती. यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना ओढण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब समोर आली होती. निवडणुकीच्या तोंडावर प्रशासन विरुध्द शिक्षकांत उफाळलेल्या वादावर अधिकारी व शिक्षक नेत्यांकडून सामंजस्याची भूमिका घेत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आल्याने या निर्णयाचे शिक्षकांतून स्वागत होत आहे.
सोमवार, 22 ऑगस्ट रोजी शिक्षक संघटनेच्या आंदोलनात संघटनेचे नेते शिवानंद भरले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा एकेरी उल्लेख केला होता. दरम्यान, या घटनेचा महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने तीव्र असा निषेध नोंदवला होता. बुधवारपासून विस्तार अधिकारी संघटनेकडून काम बंद करून याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना देण्यात आले होते.
याप्रकरणी प्रशासनानेसुद्धा कारवाईसाठी पावले उचलली होती. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भरले, मोरे हे संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मोरे यांच्यासोबत जिल्हा परिषदेत आले. त्यांनी झालेला प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
दै. 'पुढारी'कडून प्रकाशझोत
दै. 'पुढारी'ने या विषयावर बुधवारी 'शिक्षण विभागात पडली बदला घेण्याची ठिणगी' या मथळ्याखाली वृत्तविश्लेषण प्रसिद्ध करुन वस्तुस्थिती समोर आणली होती. यानंतर गुरुवारी शिक्षकनेते शिवानंद भरले, म.ज. मोरे हे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेत झालेल्या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करून शैक्षणिक भवितव्यासाठी नव्या दमाने काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार हेदेखील उपस्थित होते.