सोलापूर : व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर

सोलापूर : व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  जून महिना संपत आला तरी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. दुसरीकडे पाणी गळती वाढली आहे. दरम्यान, बुधवारी पहाटेपासून मरिआई चौकात डोणगावकडे जाणार्‍या चौकात व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. पाण्याचा लोंढा डोणगाव रोड, मरिआई चौक आणि गवळी वस्तीपर्यंत गेला असून येथील परिसर जलमय झाला आहे. पाणी वाया जात असले तरी महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हॉल्व्ह दुरुस्ती करून पाणी गळती थांबवा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात सोलापूरकरांना पाणीबाणीच्या परिस्थतीला सामोरे जावे लागले आहे. जून महिना उजाडला तरी महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्याप पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. दुसरीकडे पाईपलाईन गळती वाढतच आहे. तुळजापूर नाका, होटगी रोड, पूर्व भाग त्यानंतर आता डोणगाव चौक, मरिआई चौकात पाईपलाईन येथील व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मरिआई चौक ते एक किलोमीटरपर्यंत रस्त्यावर पाणी वाहात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरच पाणी जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. महापालिका प्रशासन, स्थानिक माजी नगरसेवकांनी लवकरात लवकर पाणी गळती थांबवावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

जड वाहतुकीवर निर्बंध आवश्यक

मरिआई चौक, डोणगाव चौक याठिकाणी सिमेंटसह विविध जड वाहतुकीची वाहने जात आहेत. त्यामुळे महिन्यात एकदा तरी व्हॉल्व्ह फुटतो किंवा पाईप फुटन पाणी गळती होत असते. एक किलोमीटर अंतरापर्यंत पाणी वाहत जाते. येथील अतिक्रमण हटवून जड वाहतूक बंद केली, तर पाणी गळती होणार नाही, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

मरिआई चौकात व्हॉल्व्ह फुटून पाणी वाहात असल्याची तक्रार आली होती. त्यामुळे तातडीने कर्मचार्‍यांना दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहे. काम युध्दपातळीवर सुरू आहे. लवकरच दुरुस्ती करुन पाणी गळती थांबवू. याठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. मध्यंतरी अतिक्रमण पाडू दिले नाही. त्यामुळे नवीन पाईपलाईन बसवली नाही. जुन्या पाईपलाईनमुळे गळती होत आहे.
– व्यंकटेश चौबे, पाणीपुरवठा अधिकारी, मनपा

तातडीने महापालिका पाणीपुरवठा विभागाला संपर्क साधून व्हॉल्व्ह दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. ही समस्या नेहमीच आहे. याठिकाणी अनेक व्हॉल्व्ह आहेत. काही कारणास्तव फुटतच असतात. मागील पाच महिन्यांनंतर आज व्हॉल्व्ह फुटला आहे. लवकरात लवकर व्हॉल्व्ह दुरुस्त करून घेण्यासाठी महापालिका कर्मचार्‍यांना सांगितले आहे.
– गणेश वानकर, माजी नगरसेवक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news