

वेणुगोपाळ गाडी; सोलापूर वृत्तसेवा : राज्यातील महापालिकेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर-जिल्हा भारतीय जनता पक्षाने आतपासूनच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत कमकुवत बुथवर लक्ष केंद्रित केले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर हे गत महिन्यात सोलापूर दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकार्यांशी संवाद साधत देशात मोदी सरकार आल्यानंतर येथील उद्योगधंद्यांमध्ये पडलेला फरक याची तपशीलवार माहिती जाणून घेतली. एवढेच नव्हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत ज्या 250 बुथवर भाजपला कमी प्रमाणात मतदान झाले अशा बुथवर खास लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही दिल्या. या सूचनेचे पालन करीत नुकतेच खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर शहर, तालुक्यांचे पदाधिकारी व अध्यक्षांची बैठक घेतली. भाजपच्यादृष्टीने कमकुवत असलेल्या बूथमध्ये भाजपची ताकद वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी खासदारांनी केले.
एकंदर सोलापूर भाजपची आतापासूनच 'मिशन 2024' ची तयारी सुरू झाली आहे. याअंतर्गत बूथयंत्रणा अधिकाधिक सक्षम केली जात आहे. या जोरावर आगामी मनपा, जि.प.सह विविध स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी आवश्यक व्यूहरचना केली जात आहे.
याचवेळी आगामी लोकसभेची तयारी केली जात आहे. सोलापूर व माढा, असे दोनही लोकसभेचे मतदारसंघ भाजपकडे आहेत.
आगामी निवडणुकीत या मतदारसंघांवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. याअनुषंगाने कमकुवत बुथवर लक्ष केंद्रित करून ते मजबूत करण्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या जाणार आहेत.