

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळा सुरू झाल्यामुळे महिलावर्गाची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवकदेखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नवीन मिरचीला कर्नाटक व आंध प्रदेशमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे मिरचीचे दर तेजीत आहे. गेल्यावर्षाच्या मानाने यावर्षी लाल मिरचीच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी भाववाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांना मिरचीचा ठसका लागला आहे.
उन्हाळा सुरू झाल्यामुळे बाजारात मसाल्याच्या पदार्थांच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढू लागली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकच्या लाल मिरच्या बाजारात येत आहेत. मसाल्यासाठी लवंगी, पांडी, ब्याडगी आणि काश्मिरी मिरचीला मोठी मागणी असते. त्यानुसार बाजारात या मिरच्यांची आवक वाढत आहे. या मिरच्यांच्या 10 ते 12 गाड्या दरदिवसाआड येत आहेत. पण गतवर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या लाल मिरचीला बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे.
यावर्षी लवंगी मिरची 200 ते 250, ब्याडगी मिरची 350 ते 450, पांदी मिरची 150 ते 200 आणि काश्मिरी मिरची 450 ते 550 रुपये किलो झाली आहे. गेल्यावर्षी हे दर 30 ते 40 रुपयांनी कमी होते. हळकुंड 150 ते 200 रुपये किलो आहे, तर धणेही 120 ते 200 रुपये किलोच्या घरात आहेत. मसाल्यासाठी लागणार्या अख्ख्या मसाल्याचे दर मात्र स्थिर आहेत. यानुसार दालचिनी 250 रुपये किलो, इलायची 1700 ते दोन हजार रुपये किलो, काळी मिरी 450 ते 700 रुपये, लवंग 800 ते 1200 किलो, तेजपान 120 ते 140 रुपये किलो, चक्री फूल 400 ते 600 रुपये किलो आहे, अशी माहिती व्यापारी राजशेखर नरुणे यांनी सांगितली.
मिरचीचे देठ तोडत बसण्यापेक्षा देठ तोडलेल्या मिरचींना मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात सध्या या मिरच्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.
घाऊक बाजारात मिरचीच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत 20 ते 25 टक्के दरवाढ झाली आहे. वाहतुकीच्या खर्चातदेखील वाढ झाली आहे. त्यातच उत्पादनदेखील घटल्याने दरात वाढ झाली आहे.
– राजकुमार नरुणे व्यापारी