सोलापूर : यंदा पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर

सोलापूर : यंदा पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाविषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली 'ज्ञानोबा-तुकोबांची' पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदीवरुन पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळ्यात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाबरोबरच संविधानाचादेखील गजर करण्यात येणार आहे.

पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखीसोबतच 'संविधान दिंडी' आयोजित करण्यात आली असून 21 जून रोजी आळंदी येथून निघणारी ही 'संविधान दिंडी' पालखीमार्गांवर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर, भजन, कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करीत 10 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

बुधवार, 22 रोजी 'संविधान दिंडी' विठोबा मंदिर, भवानी पेठ, पुणे येथे मुक्कामास येईल. यादरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील.

गुरुवार,दि. 23 रोजी पालखी मुक्काम स्थळाजवळ नाना पेठ येथे 'संविधान जलसा' हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट कलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शाह, नीलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार, दि. 24 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने, कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिकेचे वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडीपत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम संपूर्ण वेळ राबवले जाणार आहेत.

24 जून ते 10 जुलै पालखी सोहळा व संविधान दिंडी पालखीच्या ठरलेल्या मुक्काम मार्गांवर मार्गक्रमण करत जाईल व पालखीदरम्यान पायी दिंडीत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वरील उपक्रम राबविण्याचे नियोजन बार्टीमार्फत करण्यात आले असून या 'संविधान दिंडी'चा 10 जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

चर्‍होली फाटा येथे झाले दिंडीचे उद्घाटन

21 जून रोजी आळंदी येथील चर्‍होली फाटा येथे दुपारी 3 वा. या दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी 'संविधान जलसा' व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news