सोलापूर : महिना संपत आला तरी गरिबांना धान्य नाही

सोलापूर : महिना संपत आला तरी गरिबांना धान्य नाही

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  सोलापुरातील 8 लाख 84 हजार 52 रेशनकार्ड धारकांना मार्च महिना अर्ध्यावर आला तरी धान्य वाटप होत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे दुकानात रेशनचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना दुसरीकडे शासनाच्या नियमाप्रमाणे ई-पॉस मशिनमध्ये धान्यांची एन्ट्री झाली नसल्याकारणाने धान्य वाटप करता येत नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका सोलापुरातील गोरगरीब कार्डधारकांना बसत दिसत आहे.

महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सामान्य कार्डधारकांना शासनाकडून मिळणार्‍या धान्याचा लाभ वेळेवर मिळत नसल्यानेे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. धान्यासाठी शासनाकडून मिळणार्‍या धान्यासाठी कार्डधारकांना वारंवार रेशन दुकानाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. दुकानात मुबलक साठा उपलब्ध असूनही दुकानदार मालक धान्य देत नसल्यामुळे सामान्य नागरिक व दुकानदारांमधील वारंवार वादाचे प्रकार समोर येत आहेत. धान्याचा साठा दुकानात उपलब्ध असूनसुद्धा मशिनमध्ये धान्याची एन्ट्री उशिरा केली जाते व त्यामुळे सामान्य कार्डधारक धान्य घ्यायला जातच नाही.

परिणामी, हे धान्य काळ्याबाजारात जाते. यामध्ये प्रशासन, कर्मचारी व रेशन दुकानदारांचे संगनमत असल्याचा संशय सामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. धान्याची नोंद करणार्‍या टेक्निशनची मुदत मार्चअखेरला संपत आहे, तसेच गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्यामुळे ती व्यक्ती जबाबदारीने काम करताना दिसत नाही. या अडचणीमुळे धान्य वितरणात व्यत्यय येत असून कार्डधारक व रेशन दुकानदारांमध्ये वाद होत आहेत.
– सुनील पेंटर जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार.

सरकारकडून मिळणारे धान्य वेळेवर मिळत नसल्यामुळे आमच्यासारख्या गरिबांना रोज दुकानातून धान्य आणून खाणे शक्य होत नाही. नियमित धान्य मिळण्याची व्यवस्था करावी.
– महादेव पवार, अंत्योदय कार्डधारक.

मोफत धान्य मिळणारे कुटुंब

अंत्योदय ………… 60697
अन्नसुरक्षा ………. 460008
केसरी ………….. 363347
शुभ्र ……………… 57465
एकूण ………….. 884052

तारखेआधी धान्यपुरवठा करण्याची मागणी

प्रत्येक महिन्यात 10 तारखेच्या पुढे धान्य मिळते. मार्च महिन्यातील 20 तारीख आली तरी धान्याचा पत्ता नाही. प्रशासनाने नियोजन करून 10 तारखेआधी धान्यपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news