सोलापूर महापालिकेच्या रडारवर बडे थकबाकीदार!

सोलापूर महापालिकेच्या रडारवर बडे थकबाकीदार!
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची मिळकत कराची पाच लाख किंवा त्याहून अधिक रक्कम थकीत ठेवणारे मिळकतदार महापालिकेच्या रडारवर आहेत. अशांना सप्टेंबरपासून नोटिसा बजावून पुढे जप्ती, लिलावाची कटू कारवाई केली जाणार आहे.

थकीत मिळकत कराबाबत महापालिकेकडून आतापर्यंत केवळ नोटिसा देणे तसेच जप्तीची कारवाई केली जात होती. पण ही कारवाई कुचकामी ठरत असल्याने गतवर्षी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मालमत्तांचा लिलाव करुन कर वसूल करण्याचा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेतला होता. पाच लाखांहून अधिक कर थकीत ठेवणार्‍या म्हणजेच बड्या थकबाकीदारांवर लिलावाची कारवाई करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय होता. पण कोरोना आपत्तीमुळे कारवाईला मर्यादा आल्या.

सहा महिन्यांपूर्वी काही खुल्या जमिनींच्या लिलावाचा प्रयत्न झाला. मात्र त्याचा धसका घेत मिळकतदारांनी कर भरण्याचे सौजन्य दाखविल्याने आतापर्यंत एकही लिलाव झाला नाही.
या पार्श्वभूमीवर यंदा मात्र लिलावाची कटू कारवाई करण्यावर प्रशासन ठाम आहे. सन 2022-23 च्या मिळकत कर बिलांचे वाटप पूर्ण झाले असून सवलतीच्या दरात कर भरण्यास ऑगस्टअखेर मुदत आहे.

या मुदतीनंतर सप्टेंबरपासून दरमहा दोन टक्के शास्ती लागू करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या मिळकतदारांची कराची थकीत रक्कम पाच लाख किंवा त्याहून अधिक आहे अशांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. 15 दिवसांच्या मुदतीच्या नोटिसीला प्रतिसाद न दिल्यास जप्ती व त्यानंतर लिलावाची कटू कारवाई करुन कर वसूल करणार, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

500 हून अधिक थकबाकीदार

महापालिकेचा सुमारे 450 कोटींचा मिळकत कर थकीत आहे. पाच लाखांहून अधिक कर थकीत ठेवणार्‍यांची संख्या 500 हून अधिक आहे. अशांवर लिलावाच्या कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सवलतीच्या दरात कर भरण्याची मुदत संपताच जप्ती, लिलावाची कटू कारवाई केल्यास त्याचा धसका घेऊन बडे थकबाकीदार कर भरतील. परिणामी मार्चला आणखीन अनेक महिन्यांचा अवधी असतानाच थकीत कराचे प्रमाण कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news