

माळशिरस; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा झाला नव्हता. गेली दोन वर्षे राज्य परिवहन मंडळाच्या बसमधूनच आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊली पंढरपूला पांडुरंगाला भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्यावेळी वारकरी भक्तांनी गजबजणारा आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग दोन वषेर्र् सुना-सुना वाटत होता. परंतु, आता पुन्हा पालखी सोहळा सुरू झाल्याने हा पालखी महामार्ग गजबजू लागला आहे. पालखी सोहळ्याच्या पुढे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे भाविक 'ज्ञानेश्वर माऊली'चा जयघोष करीत जाताना दिसत आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. हा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे निघाला की या पालखी सोहळ्याबरोबर लाखो वारकरी, भाविक पायी चालतात, तसेच भाविकांची वाहने मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे पालखी सोहळा निघाला की माळशिरस शहरातून जाणार्या आळंदी-पंढरपूर या पालखी महामार्गावर पंढरपूरकडे जाणार्या भाविकांची वर्दळ वाढते. त्यामुळे 'ज्ञानेश्वर माऊली'चे स्वर कायम कानांवर पडतात.
तसेच, महाराष्ट्रातून सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी ज्या ठिकाणी पालखी मुक्काम असेल, तेथून आपल्या वाहनातून पुढे पंढरपूरला जातात व पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुन्हा सोहळ्यात सामील होतात. कारण, एकादशीला पांडुरंगाचे दर्शन मिळणे कठीण असल्याने व पाडुरंगाचे दर्शन घेतल्याशिवाय मनाचे समाधान मिळत नसल्याने अगोदर येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. यात त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना असते.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे संतश्रेष्ठ पालखी सोहळा झाला नाही. त्यामुळे कायम वारी करणारे भाविक वारकरी निराश झाले होते.
वारी सुरु होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली व पाडुरंगाला साकडे घालत होते. त्यामुळे यंदा वारी सुरू झाल्याने त्यांना समाधान वाटत आहे.
यंदा पालखी सोहळ्याबरोबर वारकर्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरही भाविकांची वर्दळ वाढली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.