सोलापूर : ‘ब्लॅक स्पॉट’ सूचवूनही दुर्लक्षच

सोलापूर : ‘ब्लॅक स्पॉट’ सूचवूनही दुर्लक्षच

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर- अक्कलकोट हा 35 किलोमीटरचा महामार्ग सुसाट झाल्याने दूरवरून येणार्‍या नागरिकांची चांगली सोय झाली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांसाठी हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. या महामार्गाला जोडलेल्या कर्देहळ्ळीसह इतर सहा गावांसाठी सर्व्हिस रोड व अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने येथील लोकांना चुकीच्या दिशेने जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे वळसंग पोलिसांनी 'ब्लॅक स्पॉट' (अपघात प्रवण क्षेत्र) ठरवून तेथे उपाययोजना करण्याचे सूचवूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

कुंभारीच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर कर्देहळ्ळीसह धोत्री, शिर्पनहळ्ळी, रामपूर, वडगाव, तीर्थ या सहा गावांना जाण्यासाठी फाटा आहे. जाताना काही अडचण नाही. परंतु सोलापूरला येताना कुंभारी ओढ्याच्या पुलापर्यंत नागरिकांना चुकीच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. यामुळे समोरून भरधाव वेगाने येणार्‍या वाहनांमुळे दररोज याठिकाणी अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. दररोज लहान-मोठे किरकोळ अपघात होत आहेत. महामार्ग प्राधिकरण मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. याठिकाणी कुंभारी ओढ्यापासून कर्देहळ्ळी फाट्यापर्यंत सर्व्हिस रोड वाढविणे, दुभाजक तोडणे किंवा भुयारी मार्ग तयार करणे हे पर्याय आहेत.

विशेष म्हणजे वळसंग पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी हा परिसर 'ब्लॅक स्पॉट' ठरवून तेथे उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना 22 जुलै 2022 रोजी पत्रही दिले होते.

वर्ष झाले सर्व्हिस रोड होईना

याप्रश्नी गेल्यावर्षी नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर तहसीलदार, पोलिस अधिकारी व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी संबंधित स्थळाला संयुक्तपणे भेट देऊन सर्व्हिस रोड करण्याचे आश्वासन दिले होते. याला वर्ष लोटले तरी अद्याप काहीच कार्यवाही झाली नाही. उलट आता वाहनांचा वेग वाढल्याने अपघातही वाढले आहेत.

स्वातंत्र्यदिनी रस्ता अडविणार

आता कर्देहळ्ळीसह सर्वच सहा गावांतील नागरिक पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महिन्याभरात या रस्त्याचा विषय मार्गी लावला नाही, तर स्वातंत्र्यदिनी सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news