

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मागणीअभावी बेदाणा शीतगृहात पडून आहे. बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नांकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज असताना त्यांचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ गप्प असल्याचा आरोप केला जात आहे. ही संघटना एका विशिष्ट पक्षाशी बांधली गेल्यामुळेच बेदाणा उत्पादकांना वार्यावर सोडले आहे.
कोरोनापासून द्राक्ष उत्पादन तोट्याचे बनले आहे. त्यामध्ये गेल्या दोन वर्षांत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. कित्येक शेतकर्यांची द्राक्षे ग्राहकांअभावी वेलीवरच सुकून गेली. काही शेतकर्यांनी द्राक्षाचा बेदाणा करुन नुकसान कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. राज्यात विक्रमी संख्येने बेदाणा शीतगृहात साठवून ठेवण्यात आला आहे. सध्या बेदाण्याचे दर नीचांकी पातळीवर असल्यामुळे शेतकरी विक्री करू शकत नाहीत. वाढीव भांडवली गुंतवणूक झाल्यामुळे बेदाणा उत्पादक कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. अशा आर्थिक स्थितीतही यावर्षाच्या द्राक्ष उत्पादनाची तयारी शेतकर्यांनी सुरू केली आहे. बहुतांश शेतकर्यांच्या खरडछाटण्या पूर्ण झाल्या आहेत. छाटणी व त्यानंतरच्या व्यवस्थापनावर शेतकर्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. बेदाणा उत्पादकांना या आणीबाणीच्या काळात आधार देण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे असताना द्राक्ष उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणारा द्राक्ष बागायतदार संघ याबाबत अनास्था दाखवत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
दै. 'पुढारी'शी बोलताना ते म्हणाले, ज्या पद्धतीने राज्यात ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी आपल्या प्रश्नांवर आक्रमकपणे बाजू मांडतो त्या पद्धतीने द्राक्ष उत्पादक आपल्या समस्यांबाबत आक्रमकपणे बाजू मांडताना दिसत नाही. याला या उत्पादकांची शिखर संघटना असलेला राज्य द्राक्ष बागायतदार संघ जबाबदार आहे. हा संघ एका विशिष्ट पक्षाच्या नेत्याच्या नियंत्रणात असल्यामुळे या संघावर एका विशिष्ट राजकीय पक्षाची छाप पडली आहे. त्यामुळे ही संघटना बेदाणा उत्पादकांना न्याय देऊ शकत नाही. बेदाणा उत्पादक शेतकर्यांना यंदा निसर्गाकडूनही मोठा फटका सहन करावा लागला आहे. बेदाणा शेडवर टाकल्यानंतर अनेकवेळा अवकाळीचा फटका बसला आहे.