

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन अनेक महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. निवडणुकांच्या हालचाली नाहीत. नागरिकांच्या समस्या मांडायला आणि सोडवायला दुवा असलेले लोकप्रतिनिधीरुपी व्यासपीठ सध्या नसल्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातली दुरावा वाढल्याचे अनेक प्रभागांतील समस्यांवरून दिसत आहे.
मूलभूत नागरी समस्यांबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे. सदस्यांची मुदत संपल्यानंतर शहराचा कारभार प्रशासकांनी हाती घेतला. महाविकास आघाडी सरकार असताना प्रशासकीय राजवट लागू झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले होते. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्यावर भाजप फॉर्मात आला. मात्र प्रशासकीय राजमुळे नगरसेवक व कार्यकर्त्यांना नागरी प्रश्नात काहीही करता आले नाही.
राज्यातील सत्ता बदलात शहरातील अनेक प्रभागांत प्रस्तावित केलेली विकासकामे खोळंबून राहिली. काही कामे निधी नसल्याने तर काही कामे एकमेकांच्या विरोधातील शह-काटशहमुळे प्रलंबित राहिली आहेत. यंदाच्या जोरदार पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची वाट लागली आहे. परंतु तातडीचे निधी मंजुरीअभावी अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची कामे व्हायला अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
याशिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज, कचरा या समस्या उद्भवल्यास माजी नगरसेवकांना प्रशासकीय अधिकार्यांना हक्काने बोलायला आता मर्यादा येत आहेत. समस्या सुटत नसल्यास कुठल्या अधिकार्याला संपर्क साधायचा ? हा नागरिकांपुढे प्रश्न आहे. परिणामी, समस्यांचा निपटारा व्हायला दिरंगाई होत आहे. त्यामुळे पालिकेची निवडणूक लवकर घेऊन विविध अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
'प्रशासकीय राज'मुळे शहरातील विविध भागांतील कामकाजावर परिणाम पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले रस्ते, रखडलेली विकासकामे या समस्या ठिकठिकाणी जाणवत आहेत. नगरसेवकांची मुदत संपण्याआधी प्रस्तावित केलेली कामे अर्धवट आहेत आणि प्रशासकीय राजमध्ये ज्याचे वजन आहे, त्या नेत्यांच्या प्रभागांना वगळता बाकी प्रभागात आनंदीआनंद आहे.
शहरातील रहिवासी भागाचा विकास करायला जनप्रतिनिधी हे नागरिकांसाठी प्रशासन आणि जनतेमधील दुवा आहेत. पालिकेच्या नगरसेवकांची टर्म संपून अनेक महिने झालेत आणि तातडीने निवडणुका घेतल्या जाव्यात. जेणेकरून समस्यांनी सोडवणूक होऊ शकेल.
– सूरजसिंह रजपूत, रहिवासी.शहराची हद्दवाढ होताना समाविष्ट गावांच्या समस्या सुटतील या अटीवर गावे सामील झाली; परंतु अद्यापही अनेक समस्या जशाच्या तशा आहेत. हद्दवाढ भागात मध्यमवर्ग आणि गरीब नागरिकांचा भरणा आहे. त्यामुळे प्रशासनिक यंत्रणेपर्यंत जायला नगरसेवक हेच साधन आहे. सरकारने लवकरात लवकर निवडणुका जाहीर करून जनप्रतिनिधी नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत म्हणजे विकासकामे आणि समस्यांचा निपटारा होईल.
– मुजाहिद शेख, हद्दवाढ भागातील रहिवासी.