सोलापूर : नान्नज जि.प. शाळेस ‘कारणे दाखवा’

 सोलापूर जिल्हा परिषद
सोलापूर जिल्हा परिषद

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळा 1 व 2 या दोन्ही शाळेतील घाणीबाबत दै. 'पुढारी'मध्ये 25 जून रोजी 'नान्नज जिल्हा परिषद शाळा बनली कचरा डेपो' याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गटशिक्षणाधिकार्‍यांनी दखल घेऊन दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना व सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नान्नज येथील जिल्हा परिषदेच्या दोन्ही शाळांमध्ये प्रचंड घाण तसेच शाळेच्या अवतीभोवती झाडेझुडपे व शाळेच्या गेटसमोर मातीचे ढिगारे आहेत. या दोन्ही शाळांत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण 335 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेला येण्या-जाण्यासाठी अडचण येत होती. याबाबत दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत, शालेय शिक्षण समिती व मुख्याध्यापक खडबडून जागे होत शाळेत तातडीची बैठक बोलवत बैठकीत शाळेच्या पूर्वेकडील बाजूस संरक्षक पत्रे मारण्याचा निर्णय झाला.

ग्रामपंचायत व शालेय समितीकडून दोन्ही शाळा एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेचा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. जि. प.शाळेच्या नवीन खोल्या बांधकामावेळी पाडकाम केलेले दगड-गोटे, मातीचे ढिगारे हे शाळेच्या मेन गेटजवळ कित्येक महिन्यांपासून पडून होते. ते काढून टाकले. शाळेच्या परिसरात कचराही मोठ्या प्रमाणात पडून होता, तर गवतही वाढले होते. शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते.

शाळेच्या परिसरातील घाणीकडे ग्रामपंचायत, शालेय समितीसह दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते. शाळेच्या मेन गेटजवळील बांधकामावेळी पडलेले दगड-गोटे, मातीचे ढिगारे जेसीबीद्वारे सपाट करत वाढलेले गवतही काढण्यात आले. पण, पूर्वेकडील बाजूच्या जुन्या शौचालयाच्या जागेतील वाढलेली काटेरी झाडेझुडपे काढली नाहीत, हे विशेष आहे. गावातील नागरिकांनी व पालकांनी दै. 'पुढारी'चे आभार मानले.

शाळा एकत्रसाठी क्रमांक 2 शाळा ठराव देईना
नान्नज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 व 2 शाळा एकत्र करण्याचा ग्रामपंचायत व शालेय समितीने बोलावलेल्या बैठकीत निर्णय झाला. क्रमांक 1 शाळेने लेखी ठराव ग्रामपंचायतीकडे पाठवला, पण क्र. 2 शाळेने अद्याप ग्रामपंचायतीकडे शाळा एकत्रित करण्याचा ठराव दिला नाही. याविषयी क्र.2 च्या मुख्याध्यापकांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news