

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सोलापूर महानगरपालिका चांगले काम करीत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणात क्रमांक येण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करीत आहेत. ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण हा या स्पर्धेचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच महापालिकेने कचरा वर्गीकरणावर लक्ष दिले आहे. परंतु शहरवासीयांनीही यावर लक्ष देऊन कचर्याचे वर्गीकरण केले पाहिजे. मात्र आजही शहरातील गृहसंकुले, लहान-मोठे दुकानदार यांच्याकडून कचर्याचे वर्गीकरण न करताच दिला जात आहे. कचरा उघड्यावर टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत सुमारे सरासरी 10 हजार गृहसंकुले आहेत. अनेक जुन्या चाळी आहेत. या सर्वांना पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने ओला व सुका असे कचर्याचे वर्गीकरण करुनच कचरा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुकानदारांनाही ओला आणि सुका कचर्यासाठी दोन कचराकुंड्या ठेवण्यास सांगितले आहे. महापालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसांपूर्वी ओला व सुका कचरा साठविण्यासाठी रहिवाशांना हिरवे व निळे डस्टबीन देण्यात आलेले आहेत. मात्र असे असतानाही अनेक गृहसंकुले, लहान-मोठे दुकानदार, रहिवासी कचर्याचे वर्गीकरण न करताच कचरा देत आहेत. याआधी दोन्ही कचरा एकत्रितपणे देणार्या काही गृहसंकुलांचा कचरा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने उचलला गेला नव्हता. त्यामुळे हा कचरा तसाच पडून राहिला होता. पालिकेने अशा काही गृहसंकुलांवर कारवाईदेखील केली होती. मात्र कचरा वर्गीकरण करुन देऊ, अशी ग्वाही दिल्यानंतर अशा गृहसंकुलांचा कचरा पालिकेने उचलण्यास सुरुवात केली.
यावर्षी स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 ला सामोरे जाताना सुका आणि ओला कचरा वर्गीकरण करुनच द्यावा. यासाठी पालिकेने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व गृहसंकुलांना कचरा वर्गीकरणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात जनजागृती करणारे पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील झोपडपट्टी आणि गावठाण भागात कचरा वर्गीकरणाबाबत तितक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि वर्गीकरणाबाबत सक्ती होत नसल्याने 100 टक्के कचरा वर्गीकरणाचे ध्येय पालिकेला गाठता आलेले नाही. मात्र आता पालिका सर्वांनाच कचरा वर्गीकरणासाठी आवाहन करत आहे. त्यामुळे यापुढे कचरा वर्गीकरण न करता दिल्यास सर्वांनाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
महापालिकेच्या सूचना…
श्र ओला आणि सुका अशा दोन प्रकारांत कचर्याचे वर्गीकरण करुनच प्रत्येकाने
कचरा घरातून बाहेर काढावा.
श्र ओला कचरा हिरव्या कुंडीत व सुका कचरा निळ्या कुंडीत टाकावा.
श्र जे वर्गीकरण करणार नाहीत त्यांचा कचरा उचलला जाणार नाही.
श्र कचरा उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई.
श्र परिसर स्वच्छ राहण्यासाठी कचर्याचे डबे गृहसंकुलाच्या आवारात ठेवावेत.