

सोलापूर; महेश पांढरे : रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे सोलापूरपासून पुढे म्हणजे तुळजापूर-चाकूर-लोहा भागातील काम सुमारे 70 टक्के पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होऊन हा महामार्ग किमान या टप्प्यापुरता तरी सुरू होईल, अशी सद्य:स्थिती आहे.
भारत परिमाला योजनेंतर्गत देशातील अनेक राज्ये आणि जिल्हे एकमेकांना जोडण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू केलेल्या रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या महामार्गावरील सांगली ते सोलापूर या 128 कि.मी.च्या मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. त्या पुढील सोलापूर-तुळजापूर-चाकूर-लोहा मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे.
या महामार्गांतर्गत सोलापूर शहरातील केवळ 700 मीटर लांबीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर जिल्ह्याचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस पाच टप्प्यातील जवळपास 320 कि.मी.च्या रस्त्याचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे. ब्रीज, उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असले तरी तेही लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महागामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुनील पाटील यांनी दिली.
तुळजापूर ते नांदेड या जवळपास 328 कि.मी. अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. थोड्याच दिवसांत या महामार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
– सुनील पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक