

सांगोला : पुढारी वृत्तसेवा : मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करा, यासंदर्भात मतदारांमध्ये समाज प्रबोधन करावे. आणि निवडणूक आयोगाची विशेष मोहीम सांगोला तालुक्यात प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांनी केले.
वाकी घेरडी जिल्हा परिषद शाळा येथील मतदान केंद्राची व सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर सांगोला पंचायत समितीच्या बचत भवन येथे रविवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद जी 100 कर बोलत होते. या बैठकीसाठी तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार डी. सी. कोळी यांच्यासह सर्व मंडल अधिकारी व तलाठी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर म्हणाले, या विशेष मोहिमेमुळे मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार त्याचा मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी. यासाठी मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार आहे.
1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मतदान ओळखपत्र सोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे.
हा अर्ज निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला असून मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्रमांक 6 ब द्वारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र. 6 ब भरून त्यांचे संगनिकीकरण करावे, मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र 6 ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहीत किसान पासबुक आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आर जी आय द्वारा दिलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट फोटो सहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचार्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या 11 पर्यायांपैकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येणार आहे. या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांनी केले.