संपाचा फटका हॉस्पिटलला कमी, रुग्णांना अधिक

संपाचा फटका हॉस्पिटलला कमी, रुग्णांना अधिक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिका विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून आले.

परिचारिकांच्या संपाचा फटका सर्वसाधारण रुग्णांना होत आहे. बी ब्लॉकमध्ये तर अक्षरशा अंगावर शहारे आणणारे अनेक प्रसंग नजरेस पडले. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेस रिक्षा मध्येच स्ट्रेचरची वाट बघत त्रास सहन करावा लागत होता. दुसरीकडे नवजात बालकाची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गेट समोर बाहेर वाट बघत बसलेली आजी आणि ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धावपळीत असलेली आई दिसून आली. एका तरुणाला तपासण्यासाठी या ब्लॉकमधून त्या ब्लॉकमध्ये घेऊन जात स्ट्रेचरला धक्का देणारा बापही दिसला. कोणी औषधासाठी धावपळ तर कोणी रक्ताचे पाकीटासाठी पळत आहे तर कुणी डॉक्टर कुठे गेले नर्स नाही सलाईन संपल्याने डॉक्टरांच्या शोधात आहे. अशा एक ना अनेक प्रसंगाने अंगावर अक्षरशः शहारे उभारलेे.

परिचारिकांच्या संपाच्या रविवारी दुसर्‍या दिवशी रुग्णांची हेळसांड सुरुच होती. हे सारे चित्र बघून कित्येकांनी नाईलाजस्तव खासगी हॉस्पिटलला जाणे पसंद केले. शासकीय रुग्णालयात दररोज साधारण 1200 ते 1500 रुग्णांना सेवा देण्यात येते. त्यापैकी जवळपास 500 रुग्ण हे ओपीडी मध्ये उपचार घेऊन जातात तर 1000 पेक्षा जास्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतली जाते. सध्या हॉस्पिटलमध्ये 493 रुग्ण उपचार घेत आहेत तीही व्यवस्थित मिळत नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

परिचारिकांच्या संपामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचे प्रमाण 50 टक्केपेक्षा कमी असल्याचे आकडेवारीतून समजते. यासंदर्भात सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजय ठाकूर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी निवासी डॉक्टर, नर्सिंग स्टुडंट, अध्यापक, इतर डॉक्टर यांना अतिरिक्त डयूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झालेली नाही.

माझ्या आईला शरीरात रक्ताची कमी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. परिचारिका संपात असल्यामुळे महिला वॉर्डमध्ये महिलांची काळजी घेणारे कोणीच नाही, तसेच पुरुषांना महिला वॉर्डमध्ये जास्त वेळ थांबता येत नसल्यामुळे खूप गैरसोय होत आहे.
– विशाल जाधव, रुग्णाचे नातेवाईक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news