राज्यातील 45 हजार होमगार्डना विम्याचे कवच

राज्यातील 45 हजार होमगार्डना विम्याचे कवच
Published on
Updated on

सोलापूर; अमोल व्यवहारे :  पोलिस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्याकामी साहाय्यकारी दल म्हणून काम करणे, हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु शांतता व सुव्यवस्थाकामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्याव्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्ये या दलाला पार पाडावी लागतात. त्याबाबतची तरतूद मुंबई होमगार्ड नियमांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यानुसार अग्निशमन, विमोचन, पूर परिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळ्या प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत असते. होमगार्ड हे साहाय्यकारी दल असून पोलिस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्याकरिता सहाय्य करणे, हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे.

विविध सण, उत्सव तसेच संकटकाळात पोलिसांप्रमाणेच होमगार्डही कर्तव्य बजावतात. ग्रामीण भागात अनेक होमगार्ड पोलिसांना मदत करतात. पोलिसांप्रमाणे होमगार्डनाही सुविधा मिळाव्यात, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित होती. याबाबत राज्याचे महासमादेशक डॉ. उपाध्याय यांना समजताच त्यांनी गृह विभागाकडे या मागणीचा पाठपुरावा केला. अपघातात होमगार्ड जखमी झाल्यास अथवा अपघातात मृत्यू आल्यास त्यांना अन्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी विविध बँकांशी संपर्क साधून डॉ. उपाध्याय यांनी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखेर एचडीएफसी बँकेने होमगार्डना विम्याचे सुरक्षा कवच देण्याचे मान्य केले. एचडीएफसी बँकेत खाते असणार्‍या होमगार्डना याचा लाभ मिळणार असून राज्यातील सर्व होमगार्डचे खाते हे या बँकेत काढण्यासाठी बँकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

होमगार्ड संघटनेची रचना
होमगार्ड संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी महासमादेशक हे पद शासनाने निर्माण केले आहे. होमगार्ड संघटनेच्या नियंत्रणासाठी व त्या दलाच्या एकूण कार्यकारणासाठी महासमादेशक शासनाला जबाबदार आहेत. जिल्हा स्तरावर होमगार्ड संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी समादेशक हे जिल्हा स्तरावरील मानसेवी पद निर्माण केलेले आहे. जिल्ह्यातील या दलाच्या कार्यकारणासाठी कार्यालयीन कर्मचार्‍यांची नेमणूक केलेली आहे. कार्यकारी विभागात निरनिराळ्या प्रकारची मानसेवी पदे आहेत. तालुका स्तरावर पण होमगार्ड संघटनेची तालुका पथके कार्यरत आहेत. एकूण 369 तालुका पथके सध्या कार्यरत असून तालुका स्तराखाली मोठ्या गावातून एकूण 34 उपपथके कार्यरत आहेत. होमगार्डची लक्ष्यसंख्या ठरविण्याचा अधिकार केंद्र शासनाने स्वत:कडे ठेवलेला आहे. कारण होमगार्ड संघटनेवर जो काही खर्च राज्य शासन करते त्याच्या 25 टक्के इतका खर्च केंद्र शासन सोसते. राज्यासाठीचे होमगार्ड संघटना उभारणीचे लक्ष्य आतापर्यंत 53856 आहे. राज्यात सध्या 44 हजार 833 इतके होमगार्ड हजर आहेत.

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणार्‍या होमगार्डना आता पोलिसांप्रमाणेच विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील 45 हजार होमगार्डना मिळणार आहे. पोलिस महासंचालक व होमगार्डचे महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नुकत्याच जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून मिळणार्‍या या विम्याचा लाभ घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक होमगार्डने त्यांच्या वेतनाचे खाते हे एचडीएफसी बँकेत उघडणे गरजेेचे आहे. या आर्थिक उलाढालीच्या बदल्यात बँकेकडून सर्व होमगार्डना आरोग्यसुविधा व विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news