माळशिरस : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे जिल्हा सरहद्दीवर सकाळी साडेदहाला प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, आ. जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. या वेळी लाखो वैष्णवांनी स्वागतासाठी व दर्शनासाठी गर्दी केली होती.
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥
विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या वैष्णवांच्या मेळ्याची भेट अंतिम टप्प्यात आली असल्यामुळे व विठुरायाचे दर्शन घडणार असल्यामुळे वारकरी जिल्ह्यात आगमन होताच आनंदाने नाचू लागले. पावसाने पुरती ओढ दिल्याने उन्हाची तीव्रता अशा वातावरणात देखील टाळ-मृदंगाचा ठेका, वीणेचा झंकार आणि मुखी ज्ञानोबा माऊलींचा नामघोष करीत खांद्यावर भागवतधर्माची भगवी पताका उंचावून आनंदाने नाचत वारकरी चालत होते. वारकर्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता.
सुखा लागी करीसी तळमळे ।
तरी तू पंढरीसी जाय एक वेळा।
मग अवघाची जाय होसी।
जन्मोजन्मीचे दुःख विसरसीभेटीने॥
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।
पांडुरंगाच्या भेटीने जन्मोजन्मीचे दुःख विसरण्याची वेळ आणि पायी वारी अंतिम टप्प्यात आली. उन्हाची तीव्रता, धुळीचा त्रास आशा गोष्टींचा त्रास सहन करीत शरीराचा सर्व शीण विसरून वारकरी वाटचाल करीत होते. पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच स्वागत करण्यात आले.
यावेळी आ. जयकुमार गोरे, आळंदी संस्थेचे बाळासाहेब चोपदार, माजी आ. रामहरी रुपनवर, सातार्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सातार्याचे माजी प्रांताधिकारी सचिन ढोले, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे, तहसीलदार अभिजीत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, प्रांताधिकारी टिळेकर, तहसीलदार सुरेश शेजूळ, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, किशोर सुळ, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, डॉ. मयुरा पाटील, बाळासाहेब सरगर, भानुदास सालगुडे पाटील, सोमनाथ वाघमोडे, माऊली पाटील, मामासाहेब पांढरे, मालोजीराजे देशमुख, नंदन दाते आदीसह विविध प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकर्याला आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेशी शौचालये, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकरी भाविकांना वारीत कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे. धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नातेपुते येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.
धर्मपुरी येथे पालखी आगमनापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता.