सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 मे रोजी काढण्यात आलेले आरक्षण कायम करण्यात आले. याविरोधात आलेल्या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या. त्यानुसार यासंदर्भातील अंतिम अधिसूचना सोमवारी (दि. 13) प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, याबाबत आलेली एकमेव हरकत दफ्तरी दाखल करीत आज (सोमवार) आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता 17 जून रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने 31 मे रोजी छत्रपती रंगभवन येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण अशा तीन प्रकारच्या महिला आरक्षणाची सोडत काढली होती. यामध्ये 113 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत एकूण 57 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेल्या सोडतीनुसार अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रभाग क्र. 5 अ, 9 अ, 10 अ, 23 अ, 24 अ, 28 अ, 33 अ, 36 अ या 8 जागा तर अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी 35 अ असे आरक्षण निघाले होते.
त्यानुसार सर्वसाधारण महिलांसाठी (एकूण 48 जागा) प्रभाग क्र., 1 ब, 2 अ, 2 ब, 3 अ,4 अ, 4 ब, 5 ब, 6 अ, 6 ब, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 अ, 12 अ, 13 अ, 13 ब, 14 अ, 14 ब, 15 अ, 15 ब, 16 अ, 17 अ, 17 ब, 18 अ, 19 अ, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 ब, 23 ब, 25 अ, 25 ब, 26 ब, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 अ , 31 अ, 31 ब, 32 अ, 32 ब, 33 ब, 34 अ, 35 ब, 36 ब, 37 अ, 38 ब अशा 48 जागांची निश्चिती झाली होती.
या आरक्षणसंदर्भात हरकत घेण्यास मुदत देण्यात आली होती. त्यावर केवळ एकच हरकत प्राप्त झाली होती. निवडणूक आयोगाकडून गठीत समितीने ही हरकत दप्तरी दाखल करुन सोडतीवेळचेच आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मनपाचे सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांनी दिली. सोडतीने निश्चित करण्यात आलेल्या या आरक्षित जागांची प्रभागनिहाय अंतिम अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारुप मतदार यादी 17 जूनला जाहीर होणार
मनपा निवडणुकीसाठी 17 जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यामध्ये मे अखेरपर्यंत ज्या मतदारांनी नोंदणी केली आहेत, त्यांचा समावेश या मतदार यादीत आहे. त्यानुसार येत्या 17 जून ते 25 जून पर्यंत या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून 7 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. असे ते म्हणाले.