बार्शी ; पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत दरोडेखोरांच्या नऊजणांच्या टोळीला शस्त्रांसह बार्शी तालुका पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने गजाआड केले.
रविवारी (दि. 31 ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बार्शी-भूम रस्त्यावरील काटेगाव (तालुका बार्शी) येथे त्यांना नाकाबंदीदरम्यान अटक करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत समोर आले आहे.
दशरथ काळे (वय 23), रमेश काळे (24), तानाजी काळे (25), मोहन काळे (35), शहाजी पवार (22), जालिंदर काळे (50), दिलीप पवार (35), हेमंत काळे (40, सर्व रा. लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा, ता. वाशी, जिल्हा उस्मानाबाद) व उद्धव शिंदे (21 रा. बावी, ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
पोलीस हवालदार राजेंद्र मंगरुळे वय 45 यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांना बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, बार्शी तालुका पोलिस पथकाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भूम-बार्शी रस्त्यावर काटेगाव शिवारातील एका हॉटेल समोर ग्रामसुरक्षा दलाच्या चैतन्य जाधव, विनायक जाधव, अनंता जाधवर यांच्या सोबतीने नाकाबंदी लावली होती.
याचदरम्यान रात्रीच्या सुमारास भूमकडून बार्शीच्या दिशेने भरधाव वेगाने सुमो (एम एच 25, टी 0656) निघाली होती. पोलिसांनी सुमो थांबवली चौकशी केली. यावेळी काहीजणांनी दरवाजा उघडून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी जीपला गराडा उर्वरित दरोडेखोरांना ताब्यात घेतले.
हा प्रकार समजताच थोड्याच वेळात तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, अमोल माने,तानाजी धिमधिमे, दशरथ बोबडे यांनी येवून संबंधितांची चौकशी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रात्रीच्या प्रवासाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून समर्पक उत्तर मिळाले नाहीत.
पोलिसांना संशय आल्याने त्यांच्या गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत गलोर, कथ्थी, अॅडजस्टेबल पाना, तलवार, स्कू ड्रायव्हर, कटावणी व मिरची पूड आदी हत्यारे, साहित्य मिळून आले.
पोलिसांनी त्यांना बार्शी तालुका पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. तेव्हा ते सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचे कबूल केले. त्यांच्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्यांना बार्शीच्या न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. संबंधितांनी यापूर्वी शहरासह तालुक्यातील, अन्य कुठे गुन्हे केले आहेत का, याचा तपास करणार आहेत.