पालखीमार्गाची कामे पूर्ण करा

पालखीमार्गाची कामे पूर्ण करा
Published on
Updated on

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्री संत ज्ञानेश्‍वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. पायी पालखी सोहळ्याबरोबर येणार्‍या वारकर्‍यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरील कामे 20 जूनपर्यंत पूर्ण करावीत. तसेच पायाला मुरूम, दगड लागणार नाहीत याची दक्षता घेऊन मार्गावरील स्वच्छता करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आषाढी वारी पूर्वतयारी नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संaजीव जाधव, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे विश्‍वस्त अभय टिळक, पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड. विश्‍वास ढगे, सोपान महाराज पालखी सोहळा प्रमख त्रिगुण गोसावी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राव म्हणाले की, पालखीमार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन करावे. आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक पंढरपुरात येतात. नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्थानिक लोकसंख्या तसेच येणार्‍या भाविकांची संख्या विचारात घेऊन मुबलक प्रमाणात पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. तसेच शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह खासगी बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करावा. आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यातून टँकरची मागणी करावी. यात्रा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तत्काळ मंदिर परिसर, नदीपात्र, 65 एकर येथील स्वच्छता करावी. या कालावधीत पावसाळा असल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने तत्काळ स्वच्छता व जंतनाशक फवारणी करावी.

यात्रा कालावधीत मास्क वापरणे बंधनकारक नसले तरीही नागरिकांनी आरोग्य सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करावा, मंदिर समितीने भाविकांना मास्कचे वाटप करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना राव यांनी दिल्या.
राव यांनी 65 एकर, चंद्रभागा नदी पात्र, श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत सोपान महाराज पालखी तळ
तसेच चांगावटेश्वर, चौरंगीनाथ महाराज तसेच संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणार्‍या नियोजित जागेची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना संबधितांना दिल्या.

आ. समाधान आवताडे म्हणाले की, भाविकांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ठिकठिकाणी नळ जोडणी, टँकरची व्यवस्था करावी, नगरपालिकेमार्फत उभारण्यात येणार्‍या तात्पुरत्या शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच तेथे मुबलक पाणी उपलब्ध करावे, अशा सूचना केल्या.

यावेळी प्रांताधिकारी गुरव यांनी पंढरीची वारी मोबाईल अ‍ॅपबद्दल माहिती दिली. या अ‍ॅपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्त्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.

यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी नगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा, स्वच्छता, तात्पुरती शौचालय, आदींची माहिती दिली.

जिल्ह्यातील 90 टक्के कामे पूर्ण
जिल्ह्यातील पालखीमार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असून भाविकांना स्वच्छ, पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था स्वच्छता याबाबत नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी वारकर्‍यांच्या सोयी सुविधांची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news