पंढरपूर : ओव्हरलोड ऊस वाहतूक देतेय अपघाताला निमंत्रण

पंढरपूर : ओव्हरलोड ऊस वाहतूक देतेय अपघाताला निमंत्रण
Published on
Updated on

पंढरपूर;  पुढारी वृत्तसेवा :  सध्या साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडीमधून रात्री-अपरात्री होणारी वाहतूक नियम न पाळल्याने व सावधानता न बाळगल्याने धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या इतर वाहनांनाही ती धोकादायक ठरत असल्याने अपघात वाढत आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणारी वाहने व इतरही वाहनधारकांना जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रकच्या पाठीमागे रिफ्लेक्टर लावल्यास अपघात टाळता येवू शकतील. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. या करिता साखर कारखानदारांकडून उसाची पळवापळवी सुरू आहे. जादा दर देणार्‍या कारखान्याला ऊस उत्पादक शेतकरी ऊस घालत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील इतरही साखर कारखान्यांना गाळपासाठी पंढरपूर तालुक्यातील ऊस जात असल्याचे चित्र दिसून येते. पंढरपूर शहराला जोडणारे चारही दिशांचे रस्ते चारपदरी झालेले आहेत. त्यामुळेच गुरसाळे येथील श्री विठ्ठल कारखाना, खर्डी येथील सिताराम कारखाना, भाळवणी येथील सहकार शिरोमणी, युटोपियन शुगर्स कचरेवाडी, श्रीपूर येथील पांडुरंग कारखाना, मंगळवेढा येथील दामाजी कारखाना, टाकळी सिकंदर येथील भीमा कारखाना, करकंब येथील शिंदे कारखाना तसेच वाकी शिवणे ता. सांगोला येथील साखर कारखाना, भैरवनाथ शुगर्स आदींसह सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्याला देखील ऊस जात आहे.

ऊस वाहतूक करणारी वाहने विशेषत: ट्रॅक्टर दोन ट्रॉली भरून नेतात. किमान 25 ते 30 टन ऊस दोन ट्रॅलरमधून वाहतूक केला जातो. क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक होत असल्याने अनेक ठिकाणी ट्रॅक्टरचे ट्रेलर पलटी झाल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे अपघातही होत असल्याचे चित्र दिसून येते. दिवसा ट्रॅक्टरने ऊस वाहतूक होत असताना अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील होताना दिसत आहे.
तर ट्रॅकमधून ऊस वाहतूक होत असताना देखील अशाच घटना घडताना दिसत आहेत. उसाने भरलेले ट्रक अथवा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभे केले जातात.

अंधारात दिसत नसल्याने दुचाकीस्वार, इतर वाहने धडकून अपघात घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उसाने भरून उभारलेल्या ट्रॅक्टरची काही चूक नसताना देखील केवळ ट्रॉली उभारल्याचे अंधारात दिसले नसल्याकारणाने अपघात घडत आहेत.
उसाने भरलेल्या वाहनास पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्यास त्याचवेळी पुढील बाजूने वाहन येत असल्यास त्याच्या हेडलाईटमुळे मागून येणार्‍या वाहनांना अंधारात काही दिसत नाही. यामुळे देखील अपघात घडत आहेत. तर मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर सुरू करून वेगाने वाहने चालवण्यात येत आहेत. यामुळे देखील अपघातास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर, बैलगाडी व ट्रकला पाठीमागे रिफ्लेक्टर बसवणे गरजेचे आहे.

याकरिता पोलिस विभागातील वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. कारण ऊस वाहतूक करणार्‍या ट्रक्टरचे चालक हे नवतरुण आहेत. त्यांना जास्तीचा अनुभव नसल्याने बेफिकिरीने वाहतूक नियम पायदळी तुडवून चालवत आहेत.

शहरातून होणार्‍या वाहतुकीकडे दुर्लक्ष

अवजड व ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना शहरातून ये -जा करण्यास बंदी आहे. मात्र, तरी देखील ऊसाने भरलेले ट्रॅक्टर मंगळवेढा चौक, सांगोला चौक येथून भक्तीमार्गाने रेल्वे स्टेशन मार्गे तसेच भक्तीमार्गाने येवून तालुका पोलिस स्टेशन समोरुन जात आहेत. येथील रेल्वे पुलाखाली उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या अनेक वेळा अकडून पडत असल्याचे चित्र दिसून येते. यामूळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.

रस्ते सुरक्षा अभियानाची गरज

ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर, ट्रॅक, बैलगाडी आदी ऊस वाहतूक वाहन चालक, मालकांचे पोलिसांकडून प्रबोधन करणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक सुरक्षा अभियान राबवून वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेतली तर नक्कीच अपघात कमी होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news