

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : धाराशिव साखर कारखाना व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या कारखान्यासह, कार्यालय व निवासस्थानावर आयकर विभागाचे छापासत्र सलग दुसर्या दिवशीही सुरूच राहिले. डीव्हीपी उद्योग समूह येथील ऑफिस, समृद्धी ट्रॅक्टर शोरूम तसेच निवासस्थानी आज छापेमारीची झाली. पान 2 वर
उद्योजक अभिजीत पाटील, कारखान्याशी संबंधित संचालक, व्यापारी तसेच काही शेतकरी यांनाही चौकशीकरीता बोलावण्यात आल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. असे असले तरी आयकर विभागाच्या हाती काय घबाड लागले का? याबाबत माहिती मिळू शकली नाही.
गुरुवारी (दि. 25) सकाळी 6 वाजता उद्योजक अभिजीत पाटील यांच्या पंढरपूर येथील डिव्हीपी उद्योग समुहाच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी पोलीस बंदोबस्तात धाड टाकली. हे धाडसत्र दुसर्या दिवशी देखील सुरुच आहे.
बंद पडलेले साखर कारखाने भाडेतत्वावर चालवायला घेवून ते यशस्वीपणे चालवण्यात हातखंडा असलेले अभिजीत पाटील हे साखर सम्राट म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी सांगोला येथील बंद पडलेला साखर कारखाना देखील मागील हंगामात सुरु केला आहे.
नुकत्याच झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली असून ते विठ्ठलचे चेअरमन काम पाहत आहेत. चेअरमन म्हणून काम पाहत असलेल्या धाराशिव साखर कारखाना, चोराखडी-उस्मानाबाद, धाराशिव साखर कारखाना युनिट 2 लोहा-नांदेड, वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी चांदवड नाशिक या ठिकाणी देखील धाडसत्र सुरु आहे.
साखर कारखाने, डिव्हीपी उद्योग समुह, समृध्दी ट्रॅक्टर्स, पतसंस्था यांची त्यांनी उभारणी केलेली आहे. अल्पावधीत नावारुपाला आलेले अभिजीत पाटील राजकारणातही सक्रीय होऊ लागले आहेत. साखर कारखानदारी क्षेत्रातले एक मोठे नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने गुरुवारी टाकण्यात आलेले धाडसत्र शुक्रवारी दिवसभर सुरु होते. त्यामुळे या धाडसत्राबाबत तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे.
पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. अभिजीत पाटील यांनाही ऑफिसमध्ये बोलावून घेण्यात आलेले आहे. मात्र, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. कारखान्यांचे संचालक, मोठे व्यापारी, संबंधित शेतकरी यांचीही चौकशी सुरु असल्याचे समजते. या धाडीत नेमके काय हाती लागले. हे दुसर्या दिवशी देखील समजू शकलेले नाही. या कारवाईबाबत मोठी गोपनियता पाळली जात आहे. नेमकी काहीच माहिती समोर येत नाही. मात्र आयकर विभागाच्या धाडसत्राच्या दुसर्या दिवशी देखील जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
सोलापुरातील विविध सहकारी, खासगी हॉस्पिटल्स, कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यांचे चालक-मालक यांच्या कार्यालयासह घरांवर आयकर विभागाने सुरू केलेले छापासत्र तब्बल 48 तास उलटले तरी सुरूच आहे. विविध कागदपत्रांची तपासणी, छाननी करण्याचे काम आयकर विभागाच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी अव्याहतपणे करत आहेत.
सोलापूर शहरात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आयकर विभागाची छापेमारी प्रथमच झाली असून त्यामुळे शहरवासीयांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. या छाप्यांमुळे वैद्यकीय, बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणालले आहे. कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करताना अव्वाच्यासव्वा बिले आकारल्यामुळेच आयकर विभागाने आश्विनी हॉस्पिटल्सच्या मुख्य शाखेसह कुंभारी शाखेत आणि त्यासंबंधित म्हणून हॉस्पिटल्सचे धोरणकर्ते म्हणून बिपीन पटेल यांच्या घर, कार्यालयातील छापेसत्रात आजही कागदपत्रांची पडताळी सुरू असून संबंधितांची चौकशी सुरू आहे. डॉ. गुरूनाथ परळे, डॉ. अनुपम शहा, डॉ. विजय रघोजी यांंच्या खासगी हॉस्पिटल्समधील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, ही कारवाई पुढील किती दिवस सुरू राहील हे आत्ता सांगता येणार नाही, असे अधिकृत सूत्रांनी आज सांगितले.
आयकर विभागाकडून पंढरपूरसह सोलापुरात सुरू असलेल्या छापा सत्राची चौकशी सलग दुसर्या दिवशीही सुरू आहे. साखर कारखानदार म्हणून ओळख निर्माण केलेल्या अभिजित पाटील यांच्या निवासस्थानासह कार्यालयाची कसून चौकशी सुरू आहे. तर सोलापूर शहरातील विविध सहकारी, खासगी हॉस्पिटल्स, कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यांचे चालक-मालक यांच्या कार्यालयासह निवासस्थानामध्ये तब्बल 48 तास सुरू असलेली चौकशी अखंडित सुरू आहे. विविध कागदपत्रांची तपासणी, छाननी करण्याचे काम आयकर विभागाच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी अव्याहतपणे करत आहेत. मात्र, दुसर्या दिवशीही या छाप्यातील माहिती काहीच बाहेर आली नाही. त्यामुळे या चौकशीने जिल्ह्यातील बड्या धेड्यांचे धाबे दणाणले आहेत.
सोशल मीडियावर अफवांचे पेव
सोलापुरातील छापासत्राच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाकडून अद्यापपर्यंत एकही प्रकटीकरण माध्यमांसाठी देण्यात आलेले नाही. ज्या संस्था व व्यक्तींच्या घर, कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले आहेत त्यांच्यापैकीही कुणाची आज दुसर्या दिवशीही प्रतिक्रिया माध्यमांपर्यंत आलेली नाही. यामुळे या छापासत्राविषयी अधिकृत अशी माहिती अद्यापर्यंत उपलब्ध झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर या छापासत्राविषयी सोशल मीडियावर मात्र अफवांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे.