

चिखलठाण; पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यातील जेऊर-शेटफळ रस्त्यावरील दहिगाव उपसासिंचन योजनेच्या पाण्याच्या पुलावरील स्लॅबचा काही भाग तुटून पडला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या वर आल्या असून, वाहतुकीसाठी हा रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
पुलाचा स्लॅब तुटल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून याठिकाणची योग्य ती दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरिकांमधून केली जात आहे. करमाळा तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणार्या जेऊर-चिखलठाण रस्त्यावरील जेऊर-शेटफळदरम्यान दहिगाव उपसासिंचन योजनेच्या पाण्याच्या पुलावरील स्लॅबचा काही भाग तुटून पडल्याने आतील लोखंडी सळ्या दिसत आहेत. दिवसभरात या रस्त्यावरुन अनेक वाहने ये- जा करत असतात आणि पुलावर संपूर्ण रस्त्यावरच मोठा खड्डा पडला असून या रस्त्यावरील वाहनांच्या टायरमध्ये घुसून याठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जेऊर-शेटफळ रस्त्यावरून रोज मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असते. त्यामुळे रोज पुलावरील धोकादायक प्रवास सुरूच आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. योग्य ती दुरुस्ती करुन रस्ता सुरळीत करण्याची मागणी या भागातील नागरिकांमधून केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर अनेकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन वाहने चालवणे अवघड झाले आहे. खराब रस्त्यामुळे रोज किरकोळ अपघाताची मालिक सुरूच आहे. या पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
जेऊर-करमाळा रस्त्यावरील दहिगाव उपसासिंचन योजनेवरील पुलाचा स्लॅबचा काही भाग कोसळला आहे. परिणामी, रस्त्यावरील स्लॅबच्या तारा वर आल्या आहेत. सध्या हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे. भविष्यात हा स्लॅब खचून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन हा पूल दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.