

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येताच दुधाचा प्रश्न निर्माण केला जातो. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खासगी दूध संस्थांना हाताशी धरून सरकारला अडचणीत आणण्यासाठीच दुधाचे दर पाडत असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे. दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सहकाराची पुनर्रचना करण्याची मागणी खोत यांनी केली आहे.
गुरुवारी (दि. 22) पुणे येथे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पडलेल्या दूध दरासंदर्भात एक बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी ही मागणी केली आहे. राज्यात निर्माण झालेल्या दूध दराच्या प्रश्नाबाबत विखे- पाटील यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील विधानभवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीला दुग्धविकास आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक, दुग्ध व्यवसाय विकासचे उपायुक्त, प्रादेशिक अधिकार्यांना बोलावले आहे.
एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात गायीच्या दूध खरेदीचा असलेला दर 38 रुपयांवरुन आता 32 रुपयांवर आला आहे. खासगी दूध संघचालकांनी दर कपात केल्याने सहकारी दूध संघही दरात कपात करू लागले आहेत. एकीकडे दुधाच्या खरेदी दरात कपात होत असताना दुसरीकडे पशुखाद्याचे व पशू वैद्यकीय सेवेचे दर मात्र वाढत आहेत. दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी सध्या होत असून उसाच्या एफआरपीप्रमाणे दूध खरेदीसाठीही किमान दर निश्चित करावा. या दराने दूध खरेदी न करणार्या संघांवर कारवाई करावी, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे. यासाठी गेल्या महिन्याभरापासून दूध उत्पादक शेतकर्यांनी राज्यात आंदोलन सुरू केले आहे. याची दखल घेत विखे-पाटील यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही सहभागी होणार आहेत.
खोत म्हणाले की, राज्यात दूध व्यवसायासाठी फार्मर प्रोडूसर कंपन्या स्थापन करण्यात याव्यात. अशा शेतकर्यांच्या कंपन्यांना शासनाने थेट अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. गुरुवारच्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
दुधाच्या दराबाबत सरकारने खुल्या आर्थिक धोरणाचा बाऊ न करता कायदा करावा. त्याचबरोबर राज्यातील दूध व्यवसायातील सहकाराचे पुनर्जीवन करावे.
– सदाभाऊ खोत, माजी राज्यमंत्री