

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : नियमाचा बाऊ करत भाजपने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली. कारखान्याच्या हजारो शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास शासनाच्या खर्चाने चिमणीची पुनर्निर्मिती करून देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
भाजपच्या माजी मंत्राचा बंगला अतिक्रमणात आहे. याबाबत विधानसभेत पुराव्यासह बाजू मांडू, असाही दावा पटोले यांनी केला. शुक्रवारी सायंकाळी पटोले यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याला भेट देत चिमणी परिसराची पाहणी केली. भाजप देशात सुडाचे राजकारण करत असून सूडाडापोटीच सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीवर कारवाई केली, असा दावा पटोले यांनी यावेळी केला. त्याचबरोबर भाजप ही संपुष्टात येणारी व्यवस्था असून येणार्या लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर अटळ आहे, असा दावाही यावेळी त्यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्धाराम चाकोते, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी उपस्थित होते.