Women’s Day: माझ्या दृष्टीने बुडणाऱ्या त्या महिलेचा जीव महत्त्वाचा होता

संगम्मा सगरे : ऊसतोड महिलेचा जीव वाचवला
Women’s Day
Women’s DayPudhari
Published on
Updated on
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : ऊसतोड महिला बुडत असताना माझ्या अब्रुपेक्षा तिचा जीव मला महत्त्वाचा वाटला. म्हणून, क्षणाचाही विचार न करता अंगावरील साडी काढून बारीक खडा त्यात बांधून तिच्या दिशेने फेकला. मग, तिला ओढत भरलेल्या विहिरीतून बाहेर काढले. तेव्हा, कशाचाही विचारच केला नाही. मला त्या बुडणाऱ्या महिलेला वाचवल्याचा आनंद होता. या दरम्यान मी काहीवेळ परकरवर उभी होती, या प्रसंगाची आठवण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील पंचायत समितीच्या माजी सदस्या संगम्मा अप्पासाहेब सगरे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितली.

दहा वर्षांपूर्वीचा दिवाळी सण आजही आठवतो. शेतात ऊस तोड सुरू होती. साधारणतः सकाळची दहाची वेळ असेल. सहजच शेतातील भरलेल्या विहिरीकडे लक्ष गेले. तेथे ऊसतोड मजूर महिला कपडे धुतांना दिसली. विहिरीपासून काही अंतरावर मी होते. ती काठावरच कपडे धुत होती.

अचानक त्या महिलेचा पाय घसरून पडल्याचा आवाज आला. ते ऐकताच मी विहिरीकडे पळत गेली तर पाण्यातच ती महिला आरडा ओरड करत बुडू लागली होती. जीव वाचविणे महत्त्वाचे होते.

ती वेळच तशी होती... जीव वाचला...

मी कशाचाही विचार न करता अंगावरील साडीचा वापर तिला वाचविण्यासाठी केला व तिला ओढून विहिरीच्या बाहेर काढले. ती काहीवेळ निपचित पडली होती. मग मी ऊस तोडत असलेल्यांना आवाज दिला. ते सगळेच पळत आले. तिचे अंग गार पडले होते. थोडसे हातपाय चोळल्यावर ती शुध्दीवर आली. वस्तीवर चुलीवर चहा करून दिला. ती रडू लागली. मी पाण्यातच आहे का, अशी बडबड तिने काहीवेळ केली. तिला विहिरीतून बाहेर काढताना मी माझ्या अब्रुचाही विचार केला नाही. अशीच दुसरी घटना आजही आठवते. एसटी प्रवास करताना लवंगीतील एक गरोदर महिला प्रसूत झाली. चालकाला थेट बस मंद्रुपच्या त्यावेळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यास भाग पाडले. नातेवाईक येईपर्यंत दिवसभर सोबत थांबले.

महिला ही कुटुंबातील महत्त्वाचा घटक असते. मी जर तेव्हा अब्रुचा किंवा मी अंगावरील साडी कसं काढू, कोण काय म्हणतील, असा विचार करत बसले असते तर, त्या मजूर महिलेचा जीव वाचलाच नसता. यामुळे जीव वाचवल्याचा, मदत करण्याचा आनंद आजही आहे. व्यक्तीला वेळेत मदत मिळण्याची गरज असते. वेळ न घालवता त्याचक्षणी ती केली पाहिजे.
संगम्मा सगरे, माजी पंचायत समिती सदस्या, माळकवठे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news