कुडूवाडी : सकाळच्या वेळेत सोलापूरला येण्यासाठी आवश्यक असलेली रेल्वे गाडी सुरू होत आहे. सोमवारपासून दौंड- कलबुर्गी गाडी सुरू होत असल्याने दररोज सोलापूरला येणाऱ्या चाकरमान्यांची चांगली सोय झाली आहे. कुडूवाडीसह केम, जेऊर, माढा येथील प्रवाशांची सोलापूरला सकाळी जाण्यासाठी रेल्वेची मागणी होती. कोरोना काळात विजापूर-मुंबई गाडी बंद झाली, तर मुंबई-चैन्नई मेल या गाडीची वेळ बदलल्याने दररोज प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. आता सोमवार, दि. २८ पासून सकाळी सव्वा सात वाजता सोलापूरला जाणारी पॅसेंजर गुरुवार व रविवार वगळून पाच दिवस सुरू झाल्यामुळे प्रवाशात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
कुडूवाडी, माढा, जेऊर व केम येथून सोलापूरला दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारांच्या घरात आहे. यात सर्वात जास्त प्रवासी कुडूवाडी शहरातील आहेत. पहाटे साडेपाच वाजता मुंबई-चेन्नई रेल्वे आहे. यानंतर दुपारी बारा वाजता इंद्रायणी एक्स्प्रेस गाडी आहे. सकाळी ६ ते १२ या अवधीमध्ये एकही गाडी सोलापूरला जाण्यासाठी नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोना काळापूर्वी मुंबई-चेन्नई व मुंबई विजापूर या गाड्या सोलापूरला जाताना व परतीसाठी सोयीच्या होत्या. सोलापूरला चाकरमान्यांसह विद्यार्थी, व्यापारी तसेच नागरिक खरेदीसाठी जातात. सकाळी रेल्वे बंद असल्यामुळे व एसटीचा १२० रुपयांचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक शासकीय व खासगी कंपनीत काम करणाऱ्यांना सोलापुरात घर करावे लागले. काहींनी सोलापूरला जाणे सोडून कुडूवाडीतच उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले होते. आता गाडीची सोय झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. दौंड ते गुलबर्गा डेमो गाडी ही दौंड येथून पहाटे पाच वाजता निघणार आहे. भिगवन, पारेवाडी जेऊरला सव्वा सहा, केम पावणे सात, तर कुडूवाडी येथे सकाळी सव्वा सात वाजता ही गाडी येणार आहे. माढा येथे साडेसात वाजता तसेच मोहोळ थांबा घेऊन सोलापूर येथे पावणे नऊ वाजता पोचणार आहे. गेल्या सहा वर्षाची ही रेल्वेची मागणी प्रवाशांची आता पूर्ण होते आहे. यामुळे रेल्वे प्रवाशातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ही गाडी पुढे देवदर्शनासाठीची गाडी म्हणून सुद्धा ओळखली जाणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे सकाळी सव्वानऊ वाजता गाडी पोहोचणार आहे.
स्वामी नरसिंह सरस्वती दर्शनासाठी गाणगापूर येथे ही गाडी सकाळी दहाच्या दरम्यान पोहोचणार आहे. गुलबर्गा येथे ही गाडी सव्वा अकराच्या दरम्यान पोहोचणार आहे. परत सायंकाळी ही गाडी गुलबर्गा येथून सव्वाचार वाजता सुटून सोलापूर येथे ६ वाजून ४० मिनिटांनी येणार आहे. तेथून ही गाडी कुडूवाडीला सव्वाआठ वाजता पोहोचणार आहे. पुढे केम जेऊर मार्गे दौंड ला जाणार आहे. ही गाडी पुढे देवदर्शनासाठीची गाडी म्हणून सुद्धा ओळखली जाणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे सकाळी सव्वानऊ वाजता गाडी पोहोचणार आहे. स्वामी नरसिंह सरस्वती दर्शनासाठी गाणगापूर येथे ही गाडी सकाळी दहाच्या दरम्यान पोहोचणार आहे. गुलबर्गा येथे ही गाडी सव्वा अकराच्या दरम्यान पोहोचणार आहे. परत दौंड-कलबुर्गी गाडी कायमस्वरूपी सुरू होणे गरजेचे आहे. याशिवाय मुंबई- चेन्नई या गाडीची वेळ बदलल्यास त्याचाही उपयोग प्रवाशांना होणार आहे.