

जेऊर; पुढारी वृत्तसेवा : मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. अधूनमधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण अशा बदलत्या हवामानाचा फटका करमाळाकरांना बसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू हे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून उन्हाचे चटके आणि उकाडाही अनुभवायला मिळतो आहे. दिवसभर कडक ऊन पडत आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाचा हलकासा शिडकावा होता, तर रात्री उकाडा असतो. यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांचा उष्मघाताने मृत्यूदेखील होत आहे. वातावरण दूषित असल्याने रोगराई पसरत आहे.
गत पाच दिवसांमध्ये किमान तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत.
जनावरांच्या चार्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नागरिक सध्या शीतपेयांकडे धाव घेऊ लागले आहेत. कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, उसाचा रस यासारख्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. शेतकर्यांना शेतीची कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत.