

Political Controversy | अनगर ग्रामपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच मंगळवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील देखील उपस्थित होते.
साजरा सुरू असताना विक्रांत पाटील यांनी उत्साहाच्या भरात अजित पवारांबाबत बेताल वक्तव्य केले. त्यांनी थेट अजित पवारांना "ओपन चॅलेंज" दिल्याचं व्हिडिओद्वारे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा रंगली.
या वादानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी तात्काळ पुढे येत सारवासारव केली. “माझा मुलगा अजून लहान आहे. त्याने कोणत्याही भावनेतून चुकीचे वक्तव्य केले असेल, तर त्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांबद्दल आदर व्यक्त केला.
“अजित पवार साहेब आणि शरद पवार साहेबांनी मला खूप काही दिलं आहे. माझ्या मुलाकडून मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
या विधानामुळे विक्रांत पाटील यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत राजन पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.