

सोलापूर : महाराष्ट्रामध्ये बीएड अभ्यासक्रमाला यावर्षी विद्यार्थ्यांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. सीईटी सेलद्वारे राबवण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 483 महाविद्यालयांमधील एकूण 36,698 जागांपैकी 92 टक्क्यांहून अधिक जागा भरल्या गेल्या आहेत. यामध्ये 34 हजार जागा भरल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 90.57 टक्के प्रवेशाची नोंद झाली होती, तर यंदा हा आकडा वाढला आहे. या यशात शासनाच्या योजनांचा मोठा वाटा आहे, ज्यामध्ये मुलींना शिक्षण शुल्कात 100 टक्के सवलत आणि मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे. या आर्थिक प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांचा ओढा शिक्षकी पेशाकडे वाढला आहे. या प्रवेशांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय असून, 73 टक्क्यांहून अधिक जागांवर महिला उमेदवारांनी प्रवेश घेतला आहे. शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत सकारात्मक आहे. राज्याला भविष्यात सुसज्ज शिक्षक मिळण्यास यामुळे मोठा हातभार लागणार आहे.
ईडब्ल्यूएस जागा रिक्त
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे दि. 25 जून ते 4 नोव्हेंबर या कालावधीत बीएड प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 34,170 उपलब्ध जागांपैकी 95.53 टक्के म्हणजे 32,643 जागांवर प्रवेश निश्चित झाले. तथापि, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील 2,528 जागांपैकी केवळ 1,180 जागा भरल्या गेल्याने या प्रवर्गातील 53.33 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
बीएड प्रवेशात सलग वाढ
बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशात सातत्याने वाढ होत आहे. 2023-24 मध्ये 87.73 टक्के, 2024-25 मध्ये 90.76 टक्क्यांवरून यंदा (2025-26) प्रवेशाचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षकी पेशाकडे कल वाढल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत, ज्यामुळे शिक्षण महाविद्यालयातील रिक्त जागांचे प्रमाण कमी होत आहे.