

सोलापूर : अंबादास पोळ : विधानसभेत सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्यावरील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्यभर चर्चेत आला आहे. आ. राम सातपुते हे भाजपचे आमदार असताना देखील त्यांनी विधानसभेत कुलगुरूंच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
कुलगुरूंवरील आरोपांचा पाढा वाचताना चक्क पक्षश्रेष्ठींना आपल्याच पक्षातील आ. सातपुते यांना उत्तर
देण्याची वेळ आली. यामुळे विधानसभेत विरोधी पक्षाला मिळालेल्या संधीचे सोनेही त्यांना करता आले नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती ही राज्यपालांच्या अधिपत्याखाली केली असल्याने कुलगुरू या सत्ताधारी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने विद्यापीठाचा कारभार सांभाळत असल्याची ओरड सिनेट मिटिंगमध्ये अनेकवेळा विरोधी पक्षांतील नेतेमंडळींकडून केली जात होती.
त्यावेळी विरोधी पक्षांतील मंडळींनी राज्यपालांना हटवण्यासाठी 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाओ' मोहीम राबवत सरकारला कोंडीत पकडले होते. परंतु, भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात असल्याने सत्ताधाऱ्यांचे पारडे विरोधकांसमोर जड ठरले. आता पुन्हा अशीच काहीशी परिस्थिती सोलापुरात पाहायला मिळत आहे. कुलगुरूंच्या कामावर आ. सातपुते उघडपणे आरोप करत आहेत.
अभाविपच्या विद्यार्थी संघटनेचे काम हे नेहमीच भाजपश्रेष्ठींच्या आदेशाने चालते, हेही तितकेच खरे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अभाविपकडून कुलगुरूंच्या कामावर सतत आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यामुळे 'फडणवीस' या नावावरून राजकारण पेटणार का, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधी पक्ष विधानसभेत चिडीचूप
विद्यापीठात कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांत ८ ते १२ रुपये प्रति पेपर तपासणीचा हा दर होता. मात्र, सोलापूर विद्यापीठाने ३५ रुपयांप्रमाणे हे कंत्राट मंजूर केले. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्येदेखील भ्रष्टाचार झाला. विद्यापीठाच्या कँटिनच्या कंत्राटामध्ये २३ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आ. सातपुते यांनी विधानसभेत केला. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप नको म्हणून शांत बसल्याचे दिसून आले. त्यांच्या शांततेत कोणता अर्थ दडला आहे, हे न सुटणारे कोडेच म्हणावे लागेल.
'आपलेच ओठ आणि आपलेच दात'
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आ. सातपुते यांनी सभागृहात केला. कुलगुरू डॉ. फडणवीस अधिकारांचा गैरवापर करत असल्याची टीकादेखील त्यांनी केली. याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी करत त्यांनी चक्क आपल्याच पक्षातील श्रेष्ठींना धारेवर धरले. अखेर आमदारांच्या आरोपानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरू डॉ. फडणवीस यांची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी पक्षश्रेष्ठींना कोंडीत पकडल्याने भाजपची विधानसभेत 'आपलेच ओठ आणि आपलेच दात', अशी परिस्थिती निर्माण झाली.