Rajendra Raut | कॅबिनेटमध्ये अप्पर तहसील मंजूर होणार : आ. राजेंद्र राऊत

वैरागला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिण्यासाठी प्रयत्नशील
Rajendra Raut | कॅबिनेटमध्ये अप्पर तहसील मंजूर होणार : आ. राजेंद्र राऊत
Published on: 
Updated on: 

वैराग : वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाच्या संबंधित विभागाकडून कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, आता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून, येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत वैराग अप्पर तहसील मंजूर होण्याची शक्यता असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी बार्शीला जाण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच नेहमी वैराग भागाला झुकते माप दिले आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता अंतिम मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. राऊत यांनी सांगितले. वैरागला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच हिंगणी, ढाळे पिंपळगाव व जवळगाव परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार उजनीचे पाणी या भागाला मिळावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

वैराग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा विकास करून तेथे आकर्षक शिवसृष्टी निर्माण करण्याचे ध्येय आहेे. वैराग येथील ग्रामीण रुग्णालय तसेच प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. भविष्यात वैराग परिसराच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता असून, त्यासाठीही पाठपुरावा करण्यात येईल, असे आ. राऊत यांनी स्पष्ट केले.

वैराग अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावाबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडून कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे वारंवार सांगण्यात आले होते. मात्र, यावेळी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून, तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित विभागाला आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे आ. राऊत यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संतोष निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, नाना धायगुडे आदी उपस्थित होते.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news