

Maratha reservation protest
कासेगाव : संतोष पवार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उळे येथील सोलापूर–येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील ब्रीजवर शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेला रास्ता रोको सुमारे अकरा वाजता शांततेत मागे घेण्यात आला. या काळात महामार्गाच्या दोन्ही दिशांच्या चारही लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती.
कासेगाव, उळे, वडजी, बोरामणी, गंगेवाडी, बक्षीहिप्परगे, हगलूर, होनसळ, उळेवाडीसह पंचक्रोशीतील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जितेंगे लढेंगे, हम सब जरांगे’, ‘मनोज दादा, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘आता कुठे जायचं? मुंबईला जायचं’ अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवरायांची आरती करण्यात आली. उपस्थितांनी प्रतिमेला मानाचा मुजरा केला. यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोकोमुळे सोलापूरच्या दिशेने तसेच धाराशिवच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, आंदोलनादरम्यान रुग्ण असलेल्या वाहनांना आंदोलकांनी गर्दीतून मार्ग करून दिला. त्यामुळे रुग्ण व अत्यावश्यक वाहनांना अडथळा होणार नाही, याची आंदोलकांनी काळजी घेतली.
तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले. पोलिस प्रशासनाच्या नियोजनामुळे आंदोलनस्थळी परिस्थिती नियंत्रणात राहिली. आंदोलकांनीही संयम राखल्याने रास्ता रोको शांततेत पार पडला. सकाळी अकराच्या सुमारास महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
आंदोलनस्थळी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. मराठा-कुणबी समाजाच्या ऐतिहासिक व शासकीय वंशावळींच्या नोंदींची छाननी करण्यासाठी विशेष चौकशी समिती नेमावी तसेच पात्र मराठा समाजबांधवांना कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक, पदाधिकारी तसेच कासेगाव, उळे, वडजी, बोरामणी, गंगेवाडी, बक्षीहिप्परगे, हगलूर, होनसळ, उळेवाडी व पंचक्रोशीतील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.