सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणातून गुरूवारी (दि.३१) सांगोला विधानसभा मतदारसंघातून एक आणि अक्कलकोट मतदारसंघातून एक अशा एकूण दोघा उमेदवारांनी माघार घेतली असून आता ३३३ उमेदवार राहिले आहेत.
मंगळवारी (दि.२९) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यादरम्यान जिल्हयातील अकरा विधानसभा मतदारसंघात अखेरच्या दिवसापर्यंत ३८४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी (दि.३०) छाननीत ४९ उमेदवारांचे अर्ज विविध कारणावरून बाद ठरले. त्यानंतर निवडणुकीच्या आखाड्यात ३३५ उमेदवार राहिले होते. अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर दुपारी ३ पर्यंत मुदत आहे. दरम्यान, गुरूवारी सांगोला विधानसभा मतदारसंघातून धनाजी दत्तात्रय पारेकर व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय खंडू माडकर या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारीनंतर सांगोल्यात ३१ तर अक्कलकोटमध्ये १४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. आता जिल्हयातील अकरा विधानसभा मतदारसंघातील रणांगणात ३३३ उमेदवार राहिले असले तरी सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने सोमवारी किती उमेदवारी माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे बंडाचे निशाण फडकविलेल्या उमेदवारांनाही शांत करण्याचे प्रयत्न त्या त्या राजकीय पक्षांकडून होत आहेत. दरम्यान, सोमवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.