छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या मध्य मतदार संघातून २०१४ साली एमआयएम पक्षाने विधानसभा निवडणुकीत एन्ट्री केली. या निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील मत विभाजनामुळे विजयी झाले. तोच लाभ त्यांना २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत झाल्याने राज्यातील एमआयएमचे ते पहिले खासदार ठरले. मात्र, २०१९ सालच्या विधानसभेत जिल्ह्यात ५ उमेदवार उभे करूनही एमआयएमला यश न आल्याने यंदा मध्य आणि पूर्व या दोन मतदारसंघांतच उमेदवार दिले आहे. तर पश्चिममध्ये गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर एमआयएम असतानादेखील यंदा उमेदवार देणे टाळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तसेच पक्षातूनही नाराजी व्यक्त होत आहे.
२०१४ साली एमआयएमने पहिल्यांदाच राज्यात विधानसभा निवडणूक लढविली. यात मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांतून दोन उमेदवार रिंगणात दिले होते. हे दोन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर एमआयएमने २०१९ साली राज्यात ५० हून अधिक उमेदवार दिले. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीणमधून गंगापूर-खुलताबाद मतदार संघातून उमेदवार दिले. तर शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही ठिकाणी उमेदवार दिले होते.
यंदाही एमआयएमने विधानसभेसाठी सर्वच मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज मागविले होते. यात शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघांसह वैजापूर, गंगापूर आणि सिल्लोडमधून अनेक इच्छुकांनी तयारी दर्शविली होती. मात्र असे असतानाही एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केवळ पूर्व आणि मध्य या दोन मतदारसंघांतूनच उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे पश्चिम मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे अरुण बोर्डे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळचे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांच्यापेक्षा जास्त मते पडली होती. यंदा शिंदे हे शिवेसना उबाठा गटाचे उमेदवार आहेत.
एमआयएमने उमेदवारी न दिल्याने एमआयएममधील इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे. यात अरुण बोर्डे यांनी पश्चिममधून तर माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडे यांनी वैजापूरमधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
एमआयएमने कुठे उमेदवार द्यायचे, कुठे नाही. याबाबत हैदराबादेतील एमआयएमच्या मुख्य कार्यालयात धोरण ठरले आहे. परंतु, इम्तियाज जलील यांच्या माहितीनंतरच हे सर्वकाही निर्णय झाले आहेत.